अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी. 📍11 जणांवर गुन्हे दाखल 4 जणांना अटक.

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी.


📍11 जणांवर गुन्हे दाखल 4 जणांना अटक.


एस.के.24 तास


अहेरी : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली गावालगत असलेल्या स्मशानभूमीच्या जागेवरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली.अंतिमसंस्कार करण्यासाठी गेलेल्या एका गटाला स्मशानभूमीवर अतिक्रमण करून बस्तान मांडलेल्या दुसऱ्या गटाने रोखले असता हा वाद उफाळून आला. 


यात काहीजण जखमी झाले असून त्यांच्या तक्रारीवरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील 4 लोकांना अटक करण्यात आली आहे.नागेपल्ली येथील स्मशानभूमीच्या जागेवर बाहेरून आलेल्या काही लोकांनी बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू केले होते.


रविवारी गावातील एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ स्मशानभूमीत गेले असता, अतिक्रमण करणाऱ्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यामुळे जोरदार वादावादी झाली. 

काही वेळातच वादाने हिंसक वळण घेतले आणि दोन्ही गटांत लाठ्या-काठ्यांनी तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे.या घटनेची चित्रफीत सार्वत्रिक झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार सदर जागा अनेक वर्षांपासून स्मशानभूमी म्हणून वापरली जाते. यापूर्वी दोन वेळा अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा बेकायदेशीरपणे वराहपालन सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हर्षल एकरे यांच्या नेतृत्वाखाली अहेरी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही गटांना शांत केले आणि परिस्थिती आटोक्यात आणली. पोलिसांनी सांगितले की, अतिक्रमण करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणार असून तपास सुरू आहे. 

या घटनेनंतर गावात भीतीचे व अस्वस्थतेचे वातावरण पसरले असले तरी पोलिसांच्या कारवाईनंतर शांतता राखली जाईल,अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !