गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील त्या गावातील विहिरीतून निघताय गरम पाणी,हाताला बसत आहे चटका.
📍पाहायला परिसरातील लोकांची तुफान गर्दी काय आहे कारण ?
एस.के.24 तास
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्याच्या ताटीगुडम गावातील एका विहिरीतून चक्क गरम पाणी निघत असल्याने गावकऱ्यांमध्ये कुतूहलाचा विषय निर्माण झाला आहे.विशेष म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे असून विहिरीतून बादलीने पाणी वर काढल्यानंतर ते पाण्यात हात घालून या गरम पाण्याचा अनुभव घेत आहेत.
भूगर्भातील उष्णतेचा परिणाम,खनिजांचा रासायनिक प्रभाव किंवा भूगर्भीय उष्णतेमुळे निर्माण झालेली नैसर्गिक प्रक्रिया यामुळे हा प्रकार घडल्याचे जाणकार सांगत आहेत.सत्याना मल्लय्या कटकू यांच्या मालकीची ही विहीर असून विहिरीतून सतत गरम पाणी येत आहे. पाणी इतके गरम आहे की ते थेट वापरणे शक्य नसून त्यात थंड पाणी मिसळवावे लागत आहे.
या विहिरीतून बुडबुडे आणि वाफाही निघताना दिसून येतात.या घटनेचा अनुभव घेण्यासाठी परिसरातील अनेक नागरिक गावात जात असून विहिरीतून पाणी काढून कुतूहलाने तपासणी करत आहेत.गरम पाण्याच्या झऱ्यांची नोंद अनेक ठिकाणी झालेली असली तरी गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच अशी घटना समोर आल्याने प्रशासनाने याचे संशोधन करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
गावातील स्थानिक रहिवाशी श्रीधर दुग्गीरालापाटी यांनी याबाबत माहिती देताना विहिरी च्या पाण्यात हात घातल्या तुम्हाला चटका बसतो,6 महिन्यांपासून हे असंच सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.


