नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारात वाघाने घेतला ५५ वर्षीय शेतकऱ्याचा बळी.
गावकऱ्यांचा वनपरिक्षेत्राधिकारी शहा मॅडम यांना घेराव ; नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्याच्या लेखी हमीपत्रानंतर शेतकऱ्याचा मृतदेह उचलला.
एस.के.24 तास
नागभीड : नागभीड तालुक्यातील आकापूर शेतशिवारात पुन्हा एकदा वाघाने धुमाकूळ घालत एका शेतकऱ्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली.ही घटना तळोधी (बा.) ळापुर जवळील आकापूर शेतशिवारात आज शनिवारी (25ऑक्टोबर) सकाळी उघडकीस आली आहे.
मागील आठ दिवसांपासून या परिसरात एका पट्टेदार वाघाचे प्रस्थ होते. याबाबत तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांनी माहिती दिली होती, परंतु त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने एका शेतकऱ्याचा बळी गेल्याचा आरोप करीत नागरिकांनी घटनास्थळी वनपरिक्षेत्राधिकारी शहा मॅडम यांना घेराव घालीत संताप व्यक्त केला.जोपर्यंत नागरिकांना सुरक्षिततेची हमी दिली जाणार नाही तो पर्यंत मृतदेह उचलण्यास नकार दिला आहे.त्यामुळे वृत्त लिहीपर्यंत सदर क्षेत्राचा मृतदेह घटनास्थळीच पडून आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. वासुदेव लक्ष्मण वेठे वय,५५ वर्ष असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
नागभीड तालुक्यातील आकापूर येथील शेतकरी वासुदेव लक्ष्मण वेठे ह्याची गावापासून एक दीड किलोमीटर अंतरावर शेती आहे. त्यांनी शेतामध्ये धानाची लागवड केली आहे. धानपिक कापणीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे शुक्रवारी (दि.२४) सायंकाळच्या सुमारास सदर शेतकरी हा आपल्या शेतामध्ये धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. गावकऱ्यांनी तत्काळ शेत शिवारात जाऊन शोधा शोध केली, परंतु त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. याबाबत तळोधी पोलीस व तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला माहिती देण्यात आली.
दरम्यान आज शनिवारी (दि.२५) सकाळी पुन्हा शोध घेण्यात आला असता, शेताच्या एका बाजूला वासूदेव देठे यांचा मृतदेह आढळून आला.घटनास्थळावरून वाघाच्या हालचालींचे स्पष्ट पुरावे मिळाले असून, ही घटना वाघाच्या हल्ल्यातील असल्याचे वनविभागाने प्राथमिकदृष्ट्या निश्चित केले आहे.
घटनेची माहिती मिळताच तळोधी वनपरिक्षेत्र अधिकारी शाह मॅडम, त्यांचे कर्मचारी तसेच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करण्यात येत असताना नागरिकांनी संताप व्यक्त केला आणि वनअधिकाऱ्यांना घेराव घातला आहे. नागरिकांचा आरोप आहे की, या परिसरात वाघ फिरत असल्याची माहिती वनविभागाला आधीच होती, तरीदेखील कोणतीही प्रभावी उपाययोजना वन विभागाकडून करण्यात आली नाही.
घटनास्थळावरील मिळालेल्या माहितीनुसार,आठवडा भरापासून आकापूर शेत शिवारात वाघाचे वास्तव्य दिसून येत होते. त्यामुळे नागरिकांनी तळोधी वनपरिक्षेत्र कार्यालयाला लेखी निवेदन देऊन वाघाचा बंदोबस्त करण्याचे मागणी केली होती.परंतु वन विभागाने याकडे दुर्लक्ष केले. काही दिवस फक्त वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी येऊन पाहणी केली त्यानंतर जैसे थे परस्थिती झाली. शेतशिवारात कॅमेरे बसविणे किंवा पिंजरे लावणे यासारख्या उपाययोजना करण्यास वन विभागाने कानाडोळा केल्याने शनिवारच्या या घटनेनंतर घटनास्थळी नागरिकांचा प्रचंड संताप उफाळून आला.
जोपर्यंत मृताच्या कुटुंबाला तत्काळ मदत, वाघाला पकडण्याची हमी आणि सुरक्षेची ठोस हमी तसेच गावाला कुंपण करण्याची हमी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रेत उचलू देणार नाही. अशी भूमिका कुटुंबिय अन् गावकऱ्यांनी घेतली आहे. वनपरिक्षेत्राधिकारी शहा मॅडम यांना घेराव घालण्यात आला.दरम्यान वाघाच्या हल्यात ठार झालेल्या शेतकऱ्याचा मृतदेह घटनास्थळीच पडून होता.
आकापूर निवासी असलेले वासुदेव देठे वास यांच्या कुटुंबामध्ये पत्नी एक मुलगी आणि ते स्वतः असा तिघेजण होते. त्यांच्याकडे थोडीफार शेती आहे त्यातून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते परंतु शुक्रवारी शेताकडे गेल्यानंतर वाघाने त्यांचा जीव घेतला आणि आज शनिवारी मृतदेह आढळून आला.
मृत शेतकरी हा घरचा कर्ता पुरूष होता. परंतु वाघाने बळी घेतल्याने त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. घरचा करताच गेल्याने पत्नी व मुलगी मृतदेहाजवळ प्रचंड शोक करत होत्या. दरम्यान, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेमुळे आकापूर आणि आसपासच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गामध्ये तीव्र असुरक्षिततेची भावना आहे.

