डॉ.धनराज खानोरकरांची ३६ व्या झाडी बोली साहित्य संमेलन अध्यक्षपदी निवड.
अमरदीप लोखंडे : सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,१२/१०/२५ ब्रह्मपुरीतील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील मराठी विभागप्रमुख,प्रसिद्ध कवी,ललित लेखक,पत्रकार, झाडी बोलीचे भाष्यकार,स्तंभलेखक प्रा डॉ धनराज लक्ष्मण खानोरकर यांची अतिशय प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या झाडी बोली साहित्य संमेलनाच्या इतिहासातील गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला येथे संपन्न होणाऱ्या ३६ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.बोली महर्षी डॉ हरिश्चंद्र बोरकरांनी झाडी बोली चळवळीच्या वर्धापनदिनी डॉ धनराज खानोरकरांच्या नावाची नुकतीच घोषणा केली.
डॉ.धनराज खानोरकरांचे मनासज्जना,मास्तर मातीचे, आई लाॅकडाऊन म्हणजे काय?,ओल्या वेलीची विलांटी,सिमग्याच्या बोंबा अन् चवरीच्या सेंगा हे काव्यसंग्रह प्रकाशित असून झाडी बोली लोकजीवन आणि लोकसंस्कृतीवरील बहुचर्चित 'संजोरी ' हा ललितग्रंथ आणि चार संपादित ग्रंथ त्यांच्या नावावर जमा आहेत. जवळपास ३० संशोधन पेपरही त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत प्रकाशित केले आहेत.
याशिवाय विविध मासिकांत,दैनिकात त्यांचे सातत्याने लेखन चालू असून ते झाडी बोलीचे अभ्यासक व भाष्यकार म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली आठ विद्यार्थी आचार्य पदवीसाठी संशोधन करीत आहेत.अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे.
त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताताई भैया, उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया, सचिव अशोक भैया,प्राचार्य डॉ सुभाष शेकोकर,समस्त प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी,मित्र मंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.