गडचिरोलीत आरोग्य क्रांती जागतिक आरोग्य सेवा उपलब्ध होणार. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
📍अहेरी येथे महिला-बाल रुग्णालयाचे लोकार्पण, सिरोंचात रुबी रुग्णालयाचे भूमिपूजन ; औद्योगिक विकासासोबत गडचिरोलीची आरोग्य सेवेतील ऐतिहासिक झेप.
एस.के.24 तास
गडचिरोली : दि.08 नोव्हेंबर 2025 शनिवार " गडचिरोलीचा चेहरा झपाट्याने बदलत असून औद्योगिकतेसोबत आता आरोग्य क्षेत्रातही क्रांती घडत आहे, व त्यातून जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा दक्षीण गडचिरोलीत उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अहेरी येथे १०० खाटांच्या महिला व बाल रुग्णालयाचे लोकार्पण आणि सिरोंचा येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा.लि.च्या अत्याधुनिक ३५० खाटांच्या हॉस्पिटल आणि कॉलेज कॅम्पस प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. यावेळी राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधि व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल,विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बीदरी,नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील,जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,
आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ.मिलिंद नरोटे,जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे,सहाय्यक जिल्हाधिकारी कुशल जैन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.माधुरी किलनाके,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, गडचिरोली जिल्ह्याचा आजचा दिवस 'आरोग्य क्रांती दिवस' म्हणून नोंदविला जाईल, कारण येथे औद्योगिक विकासाबरोबर आरोग्य सेवेतही क्रांतिकारक बदल घडत आहेत. अहेरी येथील १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय हे खाजगी रुग्णालयांनाही लाजवेल इतके अत्याधुनिक बनले असून, येथे मातृत्व, बाल आरोग्य आणि कुपोषणग्रस्त बालकांसाठी सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.
यासोबतच भामरागड तालुक्यातील कोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य इमारत, जरावंडी व ताडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांचे श्रेणीवर्धन, वेंगनुर उपकेंद्र आणि रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचेही लोकार्पण करण्यात आले. तसेच,चामोर्शी,मुलचेरा, एटापल्ली,भामरागड, धानोरा,कुरखेडा, कोरची व सिरोंचा या तालुक्यांतील नव्या सार्वजनिक आरोग्य पथकांचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
त्याचप्रमाणे, सिरोंचा तालुक्यातील राजेश्वरपल्ली येथे रुबी हॉस्पिटल अँड वेलनेस प्रा. लि. च्या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा पार पडला. मुख्यमंत्री म्हणाले की, रुबी हॉस्पिटल हे जागतिक स्तरावरील रूग्णांची सेवा देण्यासाठी ओळखले जाते आणि आता त्याच दर्जाची सुविधा गडचिरोलीत उपलब्ध होणार आहे. यामुळे गडचिरोलीतील रुग्णांना उपचारासाठी नागपूर, पुणे किंवा मुंबई गाठण्याची गरज उरणार नाही. विशेष म्हणजे, महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील रुग्णांना या अत्याधुनिक सेवेचा लाभ घेता येणार आहे. या रुग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आता वाढवून २४०० आजारांवर मोफत उपचार मिळणार आहेत. हॉस्पिटलसोबतच येथे वैद्यकीय व नर्सिंग कॉलेज आणि शाळाही सुरू होणार असल्याने स्थानिक युवक-युवतींना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गडचिरोली च्या सर्वांगीण विकासावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोह प्रकल्पांमुळे गडचिरोली जिल्हा 'देशातील स्टील हब' बनत आहे, पण या औद्योगिक विकासासोबतच गडचिरोलीला 'ग्रीन हब' बनवायचे आहे. त्यासाठी पाच कोटी झाडांच्या लागवडीचा निर्णय घेण्यात आला आहे. दळणवळण सुधारण्यासाठी ५०० कोटी रुपयांचे रस्ते मंजूर करण्यात आले असून, पूल व नाले बांधकामाची कामेही वेगाने सुरू आहेत.
याप्रसंगी महिलांसाठी राखीव 3 टक्के निधी मधून रु. ३ कोटी फिरता निधी प्रति गट रु. १ लाख प्रमाणे मंजूर करण्यात आलेले आहे. सदर फिरता निधी वितरण शुभारंभ मुख्यमंत्री यांचे हस्ते अहेरी तालुक्यातील बिरसामुंडा महिला बचत गट, राजाराम गटाला देऊन करण्यात आला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यात विकासाची गती वाढली असून, मागील अर्थसंकल्पात केवळ गडचिरोलीलाच ५०० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सांगितले.ते म्हणाले, “ जिल्ह्याचा समावेश राज्यातील पहिल्या दहा प्रगत जिल्ह्यांत व्हावा, यासाठी उद्योग, आरोग्य आणि महिला सक्षमीकरण या त्रीसुत्रीवर आधारित विकासाचा आराखडा राबविण्यात येत आहे. ”
महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीच्या महिलांसाठी राखीव निधीतून तीन कोटी रुपयांचा फिरता निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक बचत गटाला एक लाख रुपये दिले जातील.गडचिरोलीत यशस्वी ठरलेले हे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मनोगत व्यक्त करताना अहेरी क्षेत्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे विविध मागण्या मांडल्या. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे माहिती दिली.या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



