दोन वर्षांपासून निराधारांचे अनुदान प्रलंबित - तीव्र आंदोलनाचा विजय कोरेवार यांचा इशारा.
एस.के.24 तास
सावली : कुटुंब अर्थसाहाय योजनेचे दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले अनुदान देण्यात यावे या मागण्यासह निराधार योजनेचे नियमित अनुदान द्यावे व रोजगार हमी योजनेची मजुरी देण्यात यावी यासाठी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी दिला आहे.
राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास २० हजार रुपयाचा लाभ दिला जातो परंतु मागील दोन वर्षांपासून जवळपास १२५ लाभार्थी पात्र असतांना लाभार्थ्यांना लाभ मिळालेला नाही.दोन वर्षांपासून लाभ न मिळाल्याने कुटूंब आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे तात्काळ या योजनेची रक्कम लाभार्थ्यांना देण्यात यावी.
संजय गांधी,श्रावण बाळ निराधार योजनेचे अनुदान नियमित मिळत नाही. अनेक लाभार्थ्यांना फरवरी ते सप्टेंबर २०२५ पर्यंत अनुदान मिळालेले लाभार्थ्यांना नियमित अनुदान देण्यात यावे, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत काम केल्यानंतर १५ दिवसात मजुरी मिळणे हा मजुरांचा हक्क आहे. मात्र मागील ४-५ महिन्यापासून तालुक्यातील मजुरांना मजुरी मिळालेली नाही.
त्यामुळे ही मजुरी तात्काळ देण्यात यावी या मागण्या घेऊन २० नोव्हेंबर पासून सावली तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी निवेदनातून दिला आहे.

