गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम पातागुडम पोलिस स्टेशन कडून 2 महिन्याच्या आजारी अर्भकाच्या उपचारासाठी पोलिसांनी पुढाकार.
📍तातडीने आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या चेहर्यावर आशेचा किरण निर्माण केला.
एस.के.24 तास
सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील पातागुडम पोलिस स्टेशनने आज पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे दर्शन घडवले. गावातील एका तब्बल दोन महिन्याच्या आजारी अर्भकाच्या उपचारासाठी पोलिसांनी पुढाकार घेत तातडीने आर्थिक मदत करून संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या चेहर्यावर आशेचा किरण निर्माण केला.गावातील सरिता कलकोटा या नुकत्याच प्रसूत झालेल्या महिलेला तिच्या दोन महिन्याच्या अर्भकासाठी उपचाराची नितांत गरज होती.
मुलाच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेता डॉक्टरांनी तातडीच्या उपचारांचे निर्देश दिले. मात्र सरिता ही आर्थिकदृष्ट्या अतिशय दुर्बल परिस्थितीत असल्याने आवश्यक खर्च उभा करणे अशक्य बनले होते. ही बाब गावकर्यांमार्फत पातागुडम पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर धोत्रे व पोलिस उपनिरीक्षक मंगेश कोठावळे यांच्या निदर्शनास आली.
ही माहिती मिळताच अधिकार्यांनी विलंब न लावता आपल्या सहकार्यांना परिस्थिती सांगितली. मानवीय कर्तव्य जाणून सर्वांनी एकमुखाने मदतीसाठी पुढे येण्याचा निर्णय घेतला. पीआय धोत्रे, पीएसआय कोठावळे, पीएसआय बस्तेवाड तसेच सर्व अंमलदारांनी तत्काळ आर्थिक मदत गोळा केली आणि ती सरिता कलकोटा यांना सुपूर्द केली. अचानक मिळालेल्या या मदतीने सरिता यांना भावनिक आधार मिळाला आणि आपल्या मुलाच्या जीवासाठी लढण्याचा आत्मविश्वास जागा झाला.
याप्रसंगी पीएसआय रामटेके, दुर्गे, केंद्रे, नागूला, सडमेक, जाधव, तसेच महिला अंमलदार दुर्गे, शेडमेक आणि महाका यांचीही उपस्थिती होती. सर्वांनी मिळून पोलिस हे फक्त कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणारे नसून समाजातील प्रत्येक संकटसमयी नागरिकांसोबत उभे राहणारे खरे रक्षक आहेत, हा संदेश पुन्हा अधोरेखित केला.

