आरमोरी तालुक्यातील इंजेवारी - देऊळगाव परिसरात महिलांचा बळी घेणारा बिबट जेरबंद.
📍आरआरटी व वनविभागाची संयुक्त मोहीम यशस्वी ; ड्रोन व सीसीटीव्हीच्या साहाय्याने बिबट्याचा अचूक मागोवा.
एस.के.24 तास
आरमोरी : आरमोरी वनपरिक्षेत्रातील इंजेवारी व देऊळगाव परिसरात मागील एका महिन्यापासून सतत वावरणाऱ्या बिबट्याने १९ नोव्हेंबर रोजी देऊळगाव व २ डिसेंबर रोजी इंजेवारी येथील महिलेला ठार केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मानवी जीविताला धोका निर्माण केल्याने या बिबट्याच्या जेरबंदीची मागणी जोर धरू लागली होती.
मा.मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यप्राणी), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांच्या आदेशानंतर बी. आर. उपवनसंरक्षक वडसा व आर. एस.सूर्यवंशी सहाय्यक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात आली. प्रवीण आर. बडोले, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) आरमोरी यांच्या नेतृत्वाखाली वनकर्मचारी व जलद बचाव पथक-RRT गडचिरोली यांनी शोधमोहीम सुरू केली.
बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी २५ ट्रॅप कॅमेरे, ५ सीसीटीव्ही लाईव्ह कॅमेरे व २ अत्याधुनिक ड्रोनचा उपयोग करण्यात आला. या संयुक्त प्रयत्नांना आज ११ डिसेंबर रोजी यश मिळाले. सकाळी आरआरटी पथकाने बिबट्याला बेहोश करून सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश मिळवले.
त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मृणाल टोंगे (आरआरटी गडचिरोली) यांनी त्याची तपासणी केली व त्यांच्या देखरेखीखाली बिबट्याला विभागीय व्यवस्थापक, गोरेवाडा प्राणी संग्रहालय व वन्यप्राणी बचाव केंद्र, नागपूर येथे पाठविण्यात आले.या मोहिमेत वनरक्षक के.आर.धोंडणे (वडसा), रविंद्र चौधरी (पुराडा), ललित कुरकुटे (जीवशास्त्र) तसेच आरआरटी गडचिरोलीचे भाऊराव वाढई,अजय कुकडकर, मकसूद अली सय्यद, निखिल बारसागडे, कुणाल निमगडे व गुनवंत बावनवाडे यांनी मोलाचे योगदान दिले.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात वन्यप्राण्यांचा वावर लक्षात घेता विनाकारण जंगल परिसरात न जाणेच योग्य ठरेल.

