चंद्रपूर जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव ; ब्रम्हपुरी,मुल,नागभीड,घुग्गुस, बल्लारपूर, वरोरा, राजुरा नगर परिषदेवर काँग्रेसचा नगराध्यक्ष.
📍जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे. काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
चंद्रपूर : आज चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १० नगरपरिषद व १ नगरपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत जिल्ह्यात ११ पैकी ७ नगरपरिषदांवर विजय संपादन केला आहे.
काँग्रेसच्या या मोठ्या यशात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार हे किंगमेकर ठरले असून चंद्रपूर जिल्ह्यातील भाजपच्या पाच आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसने मात दिली.
नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निकालात विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघातील नगरपरिषदेत काँग्रेसचा दणदणीत विजय झाला.
ब्रह्मपुरी नगरपरिषदेवर काँग्रेसचे नगराध्यक्ष योगेश मिसार यांच्यासह २१ नगरसेवक विजयी झाले. तर भाजप नेते आ.सुधीर मुनगंटीवार, चिमूर आ. कीर्तीकुमार भांगडिया, चंद्रपूर आ. किशोर जोरगेवार, वरोरा आ. करण देवतळे यांच्या गडाला सुरुंग लावत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली लढविलेल्या बल्लारपूर, मूल, नागभीड, घुग्गुस, वरोरा, राजुरा नगरपरिषदेत काँग्रेसने सत्ता खेचून आणली.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश हे भाजप सरकारच्या विरोधातील जनमत आहे. महायुती सरकारची जनविरोधी धोरणे, शेतकऱ्यांची होत असणारी गळचेपी, लोकशाही तुडवून लादले जाणारे निर्णय याविरोधात जनतेने कौल दिल्याचे काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले...
आजचा विजय हा कोणत्या एका नेत्याचा नसून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने केलेली मेहनत, नेत्यांनी केलेले मार्गदर्शन आणि संघटनेची ताकद यामुळे चंद्रपुरात काँग्रेसचा तिरंगा फडकला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाने नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना दिली होती.
पक्षाने दिलेली जबाबदारीवर पार पाडत चंद्रपूर जिल्ह्यात वडेट्टीवार यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले.वडेट्टीवार यांच्या साथीला चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, जिल्ह्यातील काँग्रेसचे स्थानिक नेते व पदाधिकारी यांनी भाजपा आमदारांच्या मतदारसंघात जाऊन किल्ला लढवला. वडेट्टीवार यांनी केलेल्या नियोजनामुळे जिल्ह्यात भाजपचा धुव्वा उडाला.
आज नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले तरी ही परिवर्तनाची नांदी आहे. येणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्ष अजून जोमाने काम करणार, जनतेपर्यंत आपले काम पोहोचवणार असे वडेट्टीवार म्हणाले. आज काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये गुलाल उधळत, फटाक्यांची आतषबाजी करत सर्वत्र जल्लोष साजरा करण्यात आला.

