चंद्रपूरचे सुपूत्र म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पीडित शेतकऱ्याची भेट घेण्याची,साधा फोन करून विचारपूस करण्यासाठी वेळ नाही.- माजी मंंत्री बच्चू कडू
📍३ जानेवारी रोजी नागभीड बंद सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जयंती दिनी मिंथूर येथे रोशन कुळे याचे घरापासून ते नागभीड पर्यंत भव्य लॉग मार्च काढण्यात येणार.
एस.के.24 तास
नागभीड : नागभीड येथील रोशन कुळे यांचे प्रकरण केवळ शेती विकण्यापुरते मर्यादीत नाही तर येथे एका लाखाचे कर्ज फेडण्यासाठी गरीब शेतकऱ्याला स्वत:च्या शरीरातील महत्वाचा अवयव मूत्रपिंड विकावे लागले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर मानव अवयव तस्करीचेही हे प्रकरण आहे. अशा गंभीर प्रकरणात विदर्भाचे त्यातल्या त्यात चंद्रपूरचे सुपूत्र म्हणवून घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पीडित शेतकऱ्याची भेट घेण्याची, साधा फोन करून विचारपूस करण्यासाठी वेळ नाही.
मुख्यमंत्रीच काय पालकमंत्री, खासदार, आमदारांनीही या प्रकरणाची दखल न घेणे ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. हिंदू मुस्लीम विषय असता तर आज सर्वजण धावून आले असते मात्र येथे कपाळावर शेतकऱ्याची पट्टी बांधली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कुत्र्या मांजरा एवढेही महत्व राहिले नाही अशी टिका माजी मंंत्री बच्चू कडू यांनी केली.
बच्चू कडू यांनी शनिवारी सकाळी नागभीड तालुक्यातील मिंथूर येथे जावूनपीडित शेतकऱ्याची भेट घेतली तथा आस्थेने चौकशी केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना बच्चू कडू यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. विदर्भातील गरीब कुटूंबातील शेतकऱ्याला सावकारांकडून घेतलेले कर्ज फेडण्यासाठी स्वत:च्या शरीरातील एक अवयव विकावा लागतो ही अतिशय गंभीर गोष्ट आहे असेही कडू म्हणाले.
सदर प्रकरण केवळ शेती विक्री पुरते मर्यादित राहिले नाही. हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले आहे. तेंव्हा या प्रकरणात १९९४ चा बेकायदेशीर अवयव विक्रीचा थोटा ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करावा अशीही मागणी कडू यांनी केली.
यासोबतच अवयव तस्करी प्रकरणात दलाल, एजंट, सावकार,डॉक्टर यांच्यावरही गुन्हा दाखल करावा, मानवी तस्करी, अपहरण, फोन करून धमक्या देणे, मारहाण, फसवणूक, पासपोर्ट ॲक्ट आदी गुन्हे दाखल करावे अशीही मागणी कडू यांनी केली.
खासगी सावकारांकडून शेतकऱ्यांकडून बळजबरीने कर्ज वसुलीचे गुन्हे राज्यात सर्रास घडत आहे. तेंव्हा या प्रकरणी सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सत्यशोधक समिती गठीत करावी अशीही मागणी केली. शेतकऱ्यावर कर्जासाठी शेती सोबतच किडनी विक्रीची वेळ येणे हे प्रकरण आम्ही गांभीर्यांने घेतले आहे. या लढाईत आमच्या सोबत आता रोशन कुळे हा देखील आहे.
केवळ नागभीड, चंद्रपूर जिल्ह्यापुरते हे प्रकरण मर्यादीत नाही तर आम्ही संपूर्ण राज्यात आंदोलन करू असाही इशारा बच्चु कडू यांनी दिला. विदर्भाचे मुख्यमंत्री असतांनही फडणवीस यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही, पिडीत शेतकऱ्याची भेट तर सोडा साधा फोन देखील केला नाही. यावरूनच मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या प्रश्नवर किती गंभीर आहे हे दिसून येते अशी खोचक टिकाही कडू यांनी केली. दरम्यान या प्रकरणी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांनाही दिल्याचे कडू यांनी सांगितले.
३ जानेवारी रोजी नागभीड बंद : -
येत्या ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि जिजाऊ जयंती दिनी मिंथूर येथे रोशन कुळे याचे घरापासून ते नागभीड पर्यंत भव्य लॉग मार्च काढण्यात येणार आहे. रोशन याचे पैसे परत द्या यासाठी आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडणार आहे.
नागभीड बंद पुकारण्यात आला आहे. किडनी काढल्यामुळे रोशनच्या आयुष्याचे नुकसान झाले आहे. तेव्हा नागभीड बंदच्या एल्गारमध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन कडू यांनी केले.

