गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले. 📍राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा घेत ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय.

गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले.


📍राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मतविभाजनाचा फायदा घेत ॲड. प्रणोती निंबोरकर यांच्यासह तिन्ही उमेदवारांनी दणदणीत विजय.


सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक


गडचिरोली : जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या आणि मातब्बर नेत्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज या तिन्ही नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) स्वतंत्र आव्हानाला आणि काँग्रेसच्या विरोधाला धोबीपछाड देत भाजपने या तिन्ही सत्ताकेंद्रांवरील आपला झेंडा कायम राखला.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या गडचिरोली नगरपालिकेत भाजपने ॲड. प्रणोती निंबोरकर या तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्याला संधी दिली होती. 

नवख्या असूनही निंबोरकर यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. त्यांना ११,७६२ मते मिळाली. येथे दुसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) अश्विनी नैताम यांनी काँग्रेसच्या कविता पोरेड्डीवार यांना पिछाडीवर टाकत द्वितीय स्थान पटकावले.

 आमदार डॉ.मिलिंद नरोटे,माजी आमदार व खासदारांनी येथे पूर्ण ताकद पणाला लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आणि भाजपच्या सत्तेचा प्रभाव निंबोरकर यांच्या विजयासाठी निर्णायक ठरला.

आरमोरी नगरपालिकेत भाजपने रुपेश पुणेकर यांच्या रूपाने ‘कोरी पाटी’ असलेल्या उमेदवाराला मैदानात उतरवले होते. येथील सत्ता टिकवण्यासाठी ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व प्रकाश पोरेड्डीवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती.

 निवडणुकीच्या ऐन तोंडावर राष्ट्रवादीने काँग्रेसला खिंडार पाडल्याने येथे तिरंगी लढत झाली. याचा फायदा घेत पुणेकर यांनी ५,५२८ मते मिळवून राष्ट्रवादीच्या जयकुमार मेश्राम यांना पराभूत केले. काँग्रेसचे प्रशांत सोमकुवर येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले.

देसाईगंज मध्येही भाजपने आपला गड राखला आहे. येथे लता सुंदरकर यांनी ६,६६४ मते मिळवून काँग्रेसच्या वनिता नाकाडे यांचा पराभव केला.

माजी आमदार कृष्णा गजबे यांनी येथे निवडणुकीची सर्व सूत्रे हलवत भाजपची बांधणी भक्कम केली होती. राष्ट्रवादीने काँग्रेसच्या काही शिलेदारांना आपल्या तंबूत ओढल्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फटका काँग्रेसला बसला, तर भाजपचा विजय सुकर झाला. राष्ट्रवादीच्या नीता गुरु येथे तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.

या निवडणुकीत " नोटा " चा प्रभावही जाणवला. गडचिरोलीत ३७७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. या निकालांमुळे जिल्ह्याच्या राजकारणात भाजपची पकड पुन्हा एकदा घट्ट झाली असून, राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणूक लढवल्याचा फायदा मतविभाजनाद्वारे भाजपला मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !