भाजप चा झेंडा,पण चर्चा मात्र काँग्रेस उमेदवाराच्या " एका मताने मिळालेल्या विजयाची "

भाजप चा झेंडा,पण चर्चा मात्र काँग्रेस उमेदवाराच्या " एका  मताने मिळालेल्या विजयाची " 


एस.के.24 तास


गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजपला सत्ता स्थापन करण्यात पुन्हा एकदा यश आले आहे. मात्र, या विजयापेक्षाही संपूर्ण जिल्ह्यात प्रभाग क्रमांक ४ मधील चुरशीच्या लढतीची सर्वाधिक चर्चा रंगली आहे.या प्रभागातून काँग्रेसचे उमेदवार श्रीकांत देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या संजय मांडवगडे यांच्यावर अवघ्या एका मताने मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. ‘एका मताची किंमत काय असते’ याचा वस्तुपाठच या निकालाने घालून दिला आहे.


सकाळपासून सुरू झालेल्या मतमोजणीत सुरुवातीला भाजपने अनेक प्रभागांमध्ये आघाडी घेतली होती.प्रभाग क्रमांक ४ मध्येही सुरुवातीला चुरस दिसून आली.काँग्रेसचे श्रीकांत देशमुख आणि भाजपचे संजय मांडवगडे यांच्यात प्रत्येक मतासाठी संघर्ष सुरू होता.जसजशा मतमोजणीच्या फेऱ्या पूर्ण होत गेल्या,तसतशी उत्कंठा शिगेला पोहोचली. अखेर जेव्हा अंतिम आकडेवारी समोर आली, तेव्हा अवघ्या एका मताचा फरक पाहून निवडणूक केंद्रावर उपस्थित असलेले सर्वच अवाक झाले.


या अटीतटीच्या लढतीत श्रीकांत देशमुख यांना ७१७ मते मिळाली, तर संजय मांडवगडे यांना ७१६ मतांवर समाधान मानावे लागले. अवघ्या एका मताने विजय हुकल्याने भाजप गोटात शांतता पसरली, तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पराभूत उमेदवार मांडवगडे यांनी निकालावर आक्षेप घेत फेरमतमोजणीची मागणी केली, मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रक्रिया कायदेशीर असल्याचे स्पष्ट करत निकाल जाहीर केला.


एकीकडे संपूर्ण नगर परिषदेत भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले असताना, दुसरीकडे एका मताच्या या निकालाने राजकीय विश्लेषकांचे लक्ष वेधून घेतले आहे.लोकशाहीत प्रत्येक मत किती अमूल्य असते,हेच या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गडचिरोली शहरात आता भाजपचा नगराध्यक्ष विराजमान होणार असला तरी, श्रीकांत देशमुखांचा हा " जायंट किलर " विजय आजच्या निकालाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !