चामोर्शी शिक्षक पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा प्रकरणी उपोषणाच्या धसक्याने प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश.


चामोर्शी शिक्षक पतसंस्थेत लाखोंचा घोटाळा प्रकरणी उपोषणाच्या धसक्याने प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश.


एस.के.24 तास


चामोर्शी : प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित, चामोर्शी/मुलचेरा (र.न. २७५) येथे मागील दोन आर्थिक वर्षात लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप सभासद सचिन भास्कर कुलसंगे यांनी केला आहे. दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या संस्थेच्या ४४ व्या वार्षिक आमसभेत भेटवस्तू खरेदीतील संशयास्पद व्यवहार, नियमबाह्य ठराव आणि माहिती लपविण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.


सन २०२३-२४ व २०२४-२५ या कालावधीत सभासदांसाठी खरेदी करण्यात आल्याचे दाखविण्यात आलेल्या भेटवस्तूंमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली. सन २०२३-२४ मध्ये ९५० भेटवस्तू खरेदी दाखवून प्रत्यक्षात केवळ ६९७ वस्तू वितरित झाल्या, तर सन २०२४-२५ मध्ये ९०० भेटवस्तू खरेदी दाखवून फक्त ६१७ वस्तू वाटप झाल्याचे समोर आले. या दोन्ही वर्षांत मिळून ९,६६,१४८ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप आहे.



या शिवाय, भेटवस्तू खरेदीसाठी कोणतीही जाहिरात, कोटेशन प्रक्रिया, साठा नोंद (स्टॉक रजिस्टर) किंवा वितरण रजिस्टर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. संस्थेच्या जावक रजिस्टरमध्ये खाडाखोड, बनावट स्वाक्षऱ्या, तसेच व्यवस्थापक वैद्यकीय रजेवर असताना त्यांच्या नावाने आर्थिक व्यवहार झाल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. तसेच पतसंस्थेतील कर्मचारी श्री,कृणाल धोडरे यांनी बनावट स्वाक्षऱ्या करून स्वत:च्या वैयक्तिक खात्याचा वापर करून आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले. 


याबाबत संस्थेचे संचालक श्री,संजय गणपत लोणारे यांनी  याबाबत स्वतः सत्यता पडताळणी केले असता श्री, कृणाल धोंडरे यांनी माझ्याकडून चूक झाली व अशी चूक मी भविष्यात करणार नाही असे सांगितले.  याबाबत खुद्द संचालक श्री,संजय गणपत लोणारे यांनी संस्थेच्या अधिकृत व्हाट्सअप या प्रसार माध्यमात याची ऑडिओ क्लिप टाकून सत्यता आहे हे सिद्ध केले.


पतसंस्थेतील कॅशबुक ऑगस्ट २०२५ पासून न लिहिल्याचा खळबळजनक प्रकारही निदर्शनास आला आहे. तसेच श्री, सचिन भास्कर कुलसंगे यांना अध्यक्ष श्री, पुरुषोत्तम श्रावण  पिपरे यांनी तुम्ही वरिष्ठांकडे तक्रार केल्यास तुम्हाला होणाऱ्या दूषपरिणामास सामोरे जावे लागेल अशा शब्दात धमकी दिली आहे.


आमसभेत माहिती देण्याचा ठराव १५ दिवसांचा असताना अध्यक्षांनी तो बदलून १ महिन्याचा केल्याचा तसेच सभासदांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्याचा बेकायदेशीर ठराव घेतल्याचा आरोप आहे. हा ठराव महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या विरोधात असल्याचे सांगण्यात येत आहे.


या सर्व प्रकरणी  दि. २१/११/२०२५ रोजी सुनावणी दरम्यान पुराव्यानिशी अध्यक्ष तथा संचालक व व्यवस्थापक मंडळानी भ्रष्टाचार केला हे सिद्ध झाले आहे. मात्र अद्याप त्यांचे वर कोणत्याही प्रकारची कारवाही केलेली नाही. त्यामुळे श्री. सचिन कुलसंगे यांच्यासह ४० शिक्षकांनी सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, चामोर्शी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली. व झालेल्या सुनावणीत अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळाने संगनमताने आर्थिक घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात केल्यामुळे संपूर्ण संचालक मंडळ बरखास्त करण्याबाबत मागणी होत आहे.  


दरम्यान, दि. २४ डिसेंबर २०२५ पर्यंत संस्थेवर प्रशासक नेमून सखोल चौकशी न झाल्यास दि. २६ डिसेंबर २०२५ पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संबंधित शिक्षकांनी दिला व कारवाई न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असे कळविले होते. मात्र संपूर्ण गडचिरोली जिल्हात पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) आणि (३) लागू केला असल्याने तूर्तास श्री. सचिन भास्कर कुलसंगे यांच्यासह ४० शिक्षकांनी  आपले बेमुद्द्त उपोषण रद्द केले आहे. 


परंतु  यांच्या उपोषणाच्या धसक्याने प्रशासनाने श्री,आर.टी. वाघमारे सहाय्यक सहकारी अधिकारी अंतर्गत सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था,चामोर्शी  यांना  १५ दिवसाच्या आत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. तसेच मागील १० वर्षापासून पतसंस्थेच्या संचालक पदावर नियुक्त सर्व तत्कालीन संचालकाची सी.बी.आय.व आयकर विभाग चौकशी करावी अशी मागणी पतसंस्थेच्या अनेक सभासदाकडून होत आहे असे केल्यास करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचे नक्कीच दिसून येईल.असे न झाल्यास  जानेवारी २०२६ च्या दुसऱ्या आठवडयात बेमुदत उपोषण करण्याचा इशारा संबंधित शिक्षकांनी दिला आहे.  


या प्रकरणी श्री,माणिकराव तुरे उपाध्यक्ष नागपूर प्रदेश रिपब्लिकन पार्टी यांनी पतसंस्थेच्या सभासदांच्या वतीने दोषींवर विनाविलंब कारवाहीची मागणी केली आहे, तसेच या प्रकरणामुळे चामोर्शी तालुक्यातील शिक्षक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, सहकार विभागाकडून होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !