प्रेस क्लब मूलतर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्षा व नगरसेवकांचा सन्मान.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : प्रेस क्लब मूलच्या वतीने मूल नगर परिषदेत नुकतेच निर्वाचित झालेल्या नगराध्यक्षा व सर्व नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम रामलीला भवन,मूल येथे उत्साहात संपन्न झाला.या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्रेस क्लबचे अध्यक्ष नासिर खान होते. व्यासपीठावर नगराध्यक्षा एकता समर्थ,ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धावार, नगरसेवक प्रशांत समर्थ तसेच सामाजिक कार्यकर्ते भगवान ढोरे उपस्थित होते.
प्रेस क्लबचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नगराध्यक्षा व नगरसेवकांचे स्वागत करून त्यांना शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करण्यात आले.यावेळी अध्यक्ष नासिर खान, ज्येष्ठ पत्रकार विजय सिद्धावार, नगरसेवक प्रशांत समर्थ, नगराध्यक्षा एकता समर्थ, नगरसेवक अशोक येरमे, विलास कागदेलवार, नगरसेविका लिना फुलझेले तसेच नलिनी आडपवार यांनी आपले मनोगत व्यक्त करत मूल शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा संकल्प व्यक्त केला.
याच कार्यक्रमात पत्रकार भोजराज गोवर्धन यांची जिल्हा सहकारी बोर्डावर संचालक म्हणून अविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात मूल शहराचे पहिले नगराध्यक्ष धनजीभाई शहा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. यावेळी प्रेस क्लबच्या मागणीनुसार गांधी चौक ते विश्रामगृह या रस्त्याला धनजीभाई शहा यांचे नाव देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच मूल शहरात त्यांच्या नावाने नवे सभागृह उभारण्याचे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेस क्लबचे सदस्य डॉ.आनंदराव कुळे यांनी केले.तर आभार प्रदर्शन नितेश मॅकलवार यांनी केले. कार्यक्रमास सर्व नगरसेवकांसह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.नगरसेवक राकेश रत्नावार यांच्या शुभेच्छाही यावेळी वाचून दाखविण्यात आल्या.

