रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षांच्या स्वाक्षरीची यादी बदलणे भोवले,भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची हकालपट्टी.
एस.के.24 तास
चंद्रपूर : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने चंद्रपूर महापालिकेसाठी जाहीर झालेली पक्षाच्या उमेदवारांची यादी स्थानिक आमदाराच्या दबावात बदलण्याचे परिणाम भाजपात दिसायला सुरूवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतच महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांची तात्काळ पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या स्वाक्षरीच्या यादीनंतर भाजपचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार,महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी उमेदवारांची अदलाबदल करून स्वतंत्र याद्या जाहीर केल्याने कासनगोट्टूवार यांना पद गमवावे लागले आहे.
नगर पालिका निवडणुकीत भाजपचा पराभव झाला तेव्हापासून या जिल्ह्यात माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्यातील वाद वाढत चालला आहे.
महापालिका निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजप नेते महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे,विदर्भ विभाग संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर,माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,आमदार किशोर जोरगेवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांची संयुक्त बैठक नागपुरात झाली.
सलग दोन वेगळा झालेल्या या बैठकीत मुनगंटीवार व जोरगेवार यांच्यात शाब्दीक खडाजंगी झाली. त्यामुळे प्रदेश कार्यालयाकडे मुनगंटीवार व जोरगेवार यांच्या उमेदवारांची नावे पाठविण्यात आली.तिथेच याद्या अंतिम करण्यात आल्या. सर्वेक्षणानुसार सर्व उमेदवारांना तिकीट देण्याचे ठरले.
याच बैठकीत महानगर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी तोंड मारले. कासनगोट्टूवार यांनी सर्वक्षण बोगस आहे या शब्दात बैठकीत मुनगंटीवार यांच्या यादीला विरोध केला. तिथेच पहिली ठिणगी पडली.त्यानंतर २९ डिसेंबर रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप उमेदवारांची अंतिम यादी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांंच्याकडे पाठविली.
कासनगोट्टूवार यांनी स्थानिक आमदाराच्या प्रभावात यादीत बरेच बदल केले आणि यादीतील अनेकांची नावे गाळून ज्यांचे नाव यादीत नाही त्यांना एबी फार्म दिले. विशेष म्हणजे आमदार जोरगेवार व महानगर जिल्हाध्यक्ष कासनगोट्टूवार या दोघांनी उमेदवारांची स्वतंत्र आणि वेगवेगळे नावे असलेली यादी पाठविली.
प्रदेश कार्यालयातून आलेल्या यादीतील नावे वेगळी आणि आमदार जोरगेवार व कासनगोट्टूवार यांनी पाठविलेल्या यादीतील नावे वेगळी.त्यातच प्रदेशाध्यक्षांच्या यादीतील सुनील डोंगरे, पूजा पोतराजे, अजय सरकार, माया उईके, सत्यम गाणार, वंदना भागवत,गणेश रामगुंडावार यांची नावे कापून अन्य व्यक्तीला उमेदवारी दिली गेली.
प्रदेशाध्यक्षांची यादी बदल करून स्थानिक पातळीवर दुसरीच यादी तयार केल्याचे वृत्त लोकसत्तात प्रकाशित होताच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ३१ डिसेंबर रोजी महानगर जिल्हाध्यक्ष या पदावरून सुभाष कासनगोट्टूवार यांची तात्काळ हकालपट्टी केली.
विशेष म्हणजे कासनगोट्टूवार तुकूम प्रभाग एक मधून भाजपचे सर्वसाधारण गटातील उमेदवार आहे.
आता महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून काढल्यानंतर कासनगोट्टूवार यांची उमेदवारीही रद्द करावी अशी मागणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे केली आहे. विशेष म्हणजे कसगोट्टूवार यांच्या नियुक्तीला अद्याप वर्षही झाले नाही.
महानगर अध्यक्ष पदासाठी झालेल्या अभिप्राय बैठकीत मुनगंटीवार गटाचे राहुल पवाडे यांना सर्वाधिक २६ मते मिळाली होती. तर कसगोट्टूवार याला एकही मत मिळाले नसताना केवळ वरिष्ठांच्या आशीर्वादाने त्यांना या पदी नियुक्त केले होते. वरिष्ठांचा आदेश धुडकावून लावल्याने पद गमवावे लागले आहे.