गडचिरोली मध्ये लॉयडच्या स्वच्छता मशीनमध्ये तांत्रिक बिघाड.
📍धूळ उचलण्याऐवजी हवेत उडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास,दुरुस्ती सुरू नियोजनावर प्रश्न उपस्थित.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लॉयड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड यांच्या CSR उपक्रमांतर्गत गडचिरोली नगर परिषद यांना प्रदान करण्यात आलेल्या स्वयंचलित रस्ते स्वच्छता मशीनमध्ये उद्घाटनानंतर तांत्रिक बिघाड आढळून आला असून शहरात चर्चेला उधाण आले आहे.शहरातील प्रमुख रस्त्यांवरील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी ही अत्याधुनिक मशीन उपलब्ध करून देण्यात आली होती.
प्रत्यक्ष वापर सुरू होताच मशीन अपेक्षित कार्यक्षमता दाखवू शकली नाही.काही ठिकाणी धूळ उचलण्याऐवजी हवेत उडत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले.त्यामुळे स्वच्छता उपक्रमाचा उद्देश काही प्रमाणात फोल ठरल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.या घटनेनंतर संबंधित कंपनीकडून तत्काळ दखल घेण्यात आली असून मशीन दुरुस्त करण्यासाठी तांत्रिक पथक कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली आहे.मशीन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे आश्वासनही कंपनीकडून देण्यात आले आहे.
अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यापूर्वी अधिक काटेकोर तांत्रिक तपासणी व चाचणी प्रक्रिया आवश्यक होती का,असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.सार्वजनिक हिताच्या प्रकल्पांमध्ये घाईगडबड टाळून नियोजनबद्ध अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मतही व्यक्त होत आहे.
शहर स्वच्छ, निरोगी व प्रदूषणमुक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची गरज असली तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी तितकीच महत्त्वाची असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. दुरुस्ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मशीन अपेक्षित कार्यक्षमतेने काम करेल,अशी अपेक्षा व्यक्त होत असून,भविष्यात अशा उपक्रमांमध्ये अधिक दक्षता घेण्याची गरज अधोरेखित होत आहे.

