पोस्टमनकडून विश्वासघात...
पोस्टमनच निघाला टपाल चोर ; घरात दडवून ठेवले महत्वाचे पत्र,नोटीस,कॉल लेटर्स…
डिजिटल इंडियाच्या युगातही " पोस्टा " वर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या सामान्य जनतेच्या पाठीत पोस्टमननेच खंजीर खुपसल्याची जनभावना.
एस.के.24 तास
यवतमाळ : ज्या पोस्टमनच्या खांद्यावरील पिशवीकडे ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिक आशेने पाहतात,ज्याच्या हाकेत कुणाची तरी नोकरी, कुणाचे पेन्शन तर कुणाचे कोर्टाचे भविष्य दडलेले असते,त्याच विश्वासाला पांढरकवडा येथे काळिमा फासला गेला आहे. कर्तव्यदक्षतेचा मुखवटा घालून वावरणाऱ्या एका पोस्टमनने चक्क नागरिकांच्या स्वप्नांना स्वतःच्या घरात डांबून ठेवले.
टपालचोर असलेल्या पोस्टमनने नागरिकांच्या नावे आलेले पत्र, महत्वाची कागदपत्र, कॉल लेटर्स, एटीएम कार्ड चक्क आपल्या घरात दडवून ठेवली. संशयावरून पोस्टमनच्या घराची झडती घेतली असता, महत्त्वाच्या कागदपत्रांची तीन पोती लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.पांढरकवडा येथील ज्येष्ठ विधिज्ञ गाजी इबादुल्ला खान यांच्या सतर्कतेमुळे हे प्रकरण चव्हाट्यावर आले. मागील वर्षभरापासून त्यांची महत्त्वाची कायदेशीर पत्रे आणि पुस्तके गायब होत होती.
संशयाची सुई पोस्टमन सतीश धुर्वे याच्याकडे वळली. २२ डिसेंबर रोजी धुर्वे कामावर नसताना अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्याच्या घराची झडती घेण्यात आली,तेव्हा समोरचे दृश्य पाहून अधिकारीही चक्रावून गेले.एका कोपऱ्यात धुूळ खात पडलेली तीन मोठी पोती जप्त करण्यात आली. ही पोती उघडली असता अनेकांच्या नोकरीचे " कॉल लेटर्स ", बँकेचे एटीएम आणि क्रेडिट कार्ड्स तर अनेकांच्या आयुष्याची पुंजी असणाऱ्या जीवन विमा पॉलिसी,अनेकांचे आधार कार्ड आणि महत्त्वाच्या कोर्ट नोटिसा आढळल्या.हे सर्व साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याऐवजी या महाभागाने घरात सडत ठेवले होते.

