जिल्हा सामान्य रुग्णालयात लॅप्रोस्कोपी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.
📍२८ महिलांच्या यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आज लॅप्रोस्कोपी (दुर्बिणीद्वारे) पद्धतीचा वापर करून स्त्री कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यात एकूण ४८ नोंदणीकृत रुग्णांपैकी २८ महिलांच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या.
ग्रामीण व आदिवासी भागातील माता व बाल आरोग्य सुधारण्याच्या उद्देशाने हे विशेष शिबिर राबवण्यात आले असून, यामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमधून आलेल्या स्त्री रुग्णांचा समावेश होता.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी सकाळी नऊ वाजता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.वर्षा एस.लहाडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. लॅप्रोस्कोपी म्हणजेच दुर्बिणीद्वारे केली जाणारी ही बिनटाका शस्त्रक्रिया असून यामध्ये रुग्णांना केवळ दोन दिवस रुग्णालयात भरती राहावे लागते. या आधुनिक पद्धतीमुळे रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर कमी वेदना होतात, त्या लवकर बऱ्या होतात आणि त्यांना रुग्णालयात जास्त दिवस थांबावे लागत नाही, हे या शिबिराचे मुख्य आकर्षण ठरले आहे.
सदर शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने मोलाचे योगदान दिले असून, यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यासह महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. शशिकांत बद्देला, डॉ. हिना उंदीरवाडे, शल्य चिकित्सक डॉ. कृणाल चेंडकापूरे, डॉ. नागसेन साखरे, डॉ.मित्तल गेडाम आणि भूलतज्ज्ञ डॉ. हेमंतकुमार मडावी यांचा समावेश होता. या यशस्वी आयोजनासाठी परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांनीही परिश्रम घेतले.
यावेळी बोलताना डॉ.वर्षा एस.लहाडे यांनी सांगितले की, ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांनाही आधुनिक वैद्यकीय सुविधा जिल्ह्यातच उपलब्ध करून देणे हे शासनाचे मुख्य उद्दिष्ट असून अशा शिबिरांमुळे रुग्णांना उपचारासाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज राहणार नाही. भविष्यातही अशा प्रकारची विशेष शस्त्रक्रिया शिबिरे ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर सातत्याने आयोजित करण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

