जिवती तालुक्यातील लांबोरी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाचा विहिरीत मृतदेह सडलेल्या अवस्थेत.
📍पोलिसांनी प्राथमिक चौकशीत दोन तरुणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले.
एस.के.24 तास
जिवती : जिवती तालुक्यातील लांबोरी परिसरात एका १९ वर्षीय तरुणाचा विहिरीत संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.मृत तरुणाचे नाव गोपिनाथ भिमराव कोडापे वय,19 वर्ष रा.भुरी येसापुर ता. जिवती जिल्हा.चंद्रपूर असे असून,अज्ञात व्यक्तींनी दगड बांधून त्याची निर्घृण हत्या करून मृतदेह विहिरीत टाकल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मयताची आई सुनिता भिमराव कोडापे यांनी जिवती पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार,गोपिनाथ हा शेतमजुरीचे काम करत होता.कापूस हंगाम सुरू झाल्या पासून तो दररोज सकाळी नारपठार येथे कापूस गाडीत भरण्यासाठी जात असे व रात्री उशिरा घरी परत येत होता.त्याला कबड्डी खेळाची आवड असल्याने तो आसपासच्या गावांत मित्रांसोबत खेळण्यासाठी जात असे.
26 डिसेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 10:00.वाजेपासून गोपिनाथ घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही.नातेवाईक व ओळखीच्या व्यक्तींशी संपर्क साधूनही काही माहिती मिळाली नाही.31डिसेंबर 2025 रोजी दुपारी लांबोरी येथील लेतु कोडापे यांच्या शेतातील विहिरीत एका तरुणाचा मृतदेह पाण्यात दिसत असल्याची चर्चा गावात पसरली.
यानंतर ग्रामस्थ,पोलीस पाटील व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.मृतदेह बाहेर काढल्यानंतर कपड्यांवरून तो गोपिनाथ कोडापे असल्याची ओळख पटली.मृतदेहाच्या कंबरेला व मानेजवळ कपड्यांमध्ये मोठे दगड बांधलेले तसेच पाय बांधलेले आढळून आले.मृतदेह सडलेल्या अवस्थेत होता.
या प्रकरणी जिवती पोलिसांनी कलम १०३(१), २३८ बीएनएस अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून,मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, lचंद्रपूर येथे पाठविण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपींचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

