चौकशी च्या धसक्याने चामोर्शी शिक्षक पतसंस्थेत गायब भेट वस्तूची चोरीने खरेदी.
एस.के.24 तास
चामोर्शी : येथील प्राथमिक शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित चामोर्शी /मूलचेरा र नं २७५ या संस्थेत काही दिवसांपासून लाखोच्या घोटाळ्याच्या खुलासाने जिल्ह्यातील सहकार क्षेत्र ढवळून निघाले असतांनाच दि. २३ डिसेंबर २०२५ च्या सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,चामोर्शी यांच्या पत्रानुसार श्री.आर.टी.वाघमारे सहायक अधिकारी अंतर्गत सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोर्शी यांचे कडून संस्थेच्या चौकशीला सुरुवात झाली.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाने आपली बरखास्ती टाळण्यासाठी व पुढील कार्यवाही पासुन बचाव करण्यासाठी विविध मार्गाचा वापर करून सर्व All Well आहे असे दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून सभासदांना सन २०२३-२४ व सन २०२४-२५ या वर्षात वाटप केलेल्या भेटवस्तू ज्या संचालक मंडळाने आपल्या घशात घातल्या होत्या त्या घाई गडबडीत पुरवठादाराकडून मागवून संस्थेत आणून ठेवल्याचे दिनांक,01 जानेवारी रोजी तक्रारदार सचिन कुळसंगे, अशोक रायशिडाम, हेमंत चावरे व इतरांच्या प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले.
तसेच प्रभारी व्यवस्थापक यांच्यावर दबाव आणून त्यांच्याकडून संस्थेच्या बचावासाठी मागील तारीख दाखवून पत्र लिहून घेत असल्याचे लक्षात येते. असे जरी होत असले तरी श्री सचिन भास्कर कुलसंगे व इतर तक्रारदाराकडे अगोदरच भक्कम पुरावे असल्याने अध्यक्ष व संचालक मंडळाची धावपळ कामी येणार नाही असे दिसते.
दुसरीकडे मात्र चौकशी अधिकारी श्री,आर.टी.वाघमारे यांनी एकतर्फी चौकशी सुरू केल्याचे कळते.तक्रारदार श्री, सचिन भास्कर कुलसंगे व इतर यांना देखील पत्र देऊन चौकशी ठिकाणी बोलवणे गरजेचे असतांना श्री, आर. टी. वाघमारे यांनी ज्यांचेवर आरोप आहेत त्यांनाच सोबत घेऊन चौकशी सुरू केल्याचे कळते. त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक व संचालक मंडळाना पुरावे नष्ट करण्यासाठी रान मोकळे झाल्याचे दिसते.
त्यामुळे निष्पक्ष चौकशी होण्यासाठी दि.२१ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या मा. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, चामोशी यांचे दालनातील सुनावणी दरम्यान भ्रष्टाचार सिद्ध होत असल्याचे पुरावे सादर केल्यानुसार अगोदर अध्यक्ष व व्यवस्थापक यांना पदावरून हटवून प्रशासकाची नियुक्ती करूनच चौकशी करावी व सहकार कायद्यानुसार गुन्हा दाखल करून सर्व सामान्य सभासदांच्या खिशावर दरोडा मारलेली रक्कम वसूल करावी अशी मागणी बहुतांश सर्वसामान्य सभासद करीत आहेत.

