ने.हि.विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,ब्रम्हपुरीचे लक्ष्मण मेश्राम यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड.
व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धेत यश.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र (SCERTM), पुणे द्वारा शिक्षणक्षेत्राशी संबंधित शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांचेतील कौशल्य व नवकल्पना विकसित करण्याच्या उद्देशाने सत्र 2025-26 पासून 'शिक्षक व अधिकारी/कर्मचारी स्पर्धा' चे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,नागपूर येथे घेण्यात आलेल्या विभागस्तरीय 'व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धे'त नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, ब्रम्हपुरी येथे कार्यरत असणारे स्पर्धा परीक्षेचे जाणकार व्यक्तिमत्व लक्ष्मण मेश्राम सर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण सादरीकरणाने परीक्षकांची व उपस्थितांची मने जिकंत यश संपादन केले व राज्यस्तरीय स्पर्धेकरिता आपली निवड निश्चित केली.
'व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन स्पर्धा' यात लक्ष्मण मेश्राम यांनी ' दहावी/बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी' हा विषय हाती घेतांना त्यास आपल्या अभ्यासपूर्ण व उत्कृष्ट सादरीकरण कौशल्याने योग्य न्याय देत विद्यालयाचे नाव नागपूर विभागात व राज्यावर उंचावले.विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन सातत्याने करणारे लक्ष्मण मेश्राम हे स्वतः पुढाकार घेत विद्यालयातील अधिकारी वर्गाच्या पाठिंब्यामुळे विविध विभागातील प्रशासकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन कार्यक्रम विद्यालयात आयोजित करित असतात.
लक्ष्मण मेश्राम यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाल्याबद्दल ने.भै.हि.शिक्षण संस्था,ब्रम्हपुरीचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया, सचिव अशोकजी भैया,सहसचिव ॲड. भास्करराव उराडे, सदस्य प्रा. सुभाषजी बजाज, सदस्य गौरवजी भैया व संस्थेचे सर्व पदाधिकारी,प्राचार्य के. एम. नाईक, उपप्राचार्य ए.डब्ल्यू. नाकाडे, पर्यवेक्षक प्रा.पी.आर. जीभकाटे तथा शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

