कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथील अवैध वाळूसाठा प्रकरण पाचपट दंडाचा दणका...१ कोटी ४६ लाख १९ हजार ६०० रुपयांची ही दंडात्मक रक्कम सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश.
📍कारवाईमुळे कुरखेडा परिसरातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ जिल्हाधिकाऱ्यांचा वाळूतस्करांना दणका.
एस.के.24 तास
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील नान्ही येथे उघडकीस आलेल्या ७८६ ब्रास अवैध वाळूसाठा प्रकरणी महसूल विभागाने अखेर कडक पाऊल उचलले आहे.तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या सखोल चौकशीनंतर,कुरखेडा तहसीलदारांनी " तारामंगल एजन्सी " ला १ कोटी ४६ लाख १९ हजार ६०० रुपयांचा दंड आकारून दणका दिला आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चौकशीचे आदेश दिले होते.या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
नान्ही येथील सर्वे क्रमांक १२७ मध्ये मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा करून अनधिकृतपणे साठा करण्यात येत असल्याचे माध्यमांनी उघड केले होते. यावरून शहानिशा करण्यासाठी मंडळ अधिकारी आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन मोजणी केली असता, तिथे ७८६ ब्रास वाळूचा साठा विनापरवाना आढळला. या साठ्याबाबत कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याचे प्राथमिक तपासातच स्पष्ट झाले होते. यानंतर तीन आयएएस अधिकाऱ्यांच्या उच्चस्तरीय समितीने केलेल्या सखोल चौकशीतदेखील वाळू साठा अवैध असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी तारामंगल एजन्सीचे प्रोप्राईटर शंभू राजकुमार अग्रवाल (रा. देवरी, जि. गोंदिया) यांना तहसील कार्यालयामार्फत वारंवार नोटिसा बजावून बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, २१ जानेवारी रोजी पार पडलेल्या अंतिम सुनावणीतही त्यांना या साठ्याबाबत कोणतीही वैध कागदपत्रे किंवा समाधानकारक पुरावे सादर करता आले नाहीत. अखेर प्रशासनाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला.
पाचपट दंडाचा दणका
महसूल विभागाने केलेल्या दंड आकारणीनुसार, ३ हजार ६०० रुपये प्रति ब्रास बाजारमूल्य असलेल्या वाळूवार वर पाचपट दंड (१८ हजार रुपये) आणि ६०० रुपये रॉयल्टी असा एकूण १८ हजार ६०० रुपये प्रति ब्रासप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे. एकूण ७८६ ब्रास साठ्यासाठी १ कोटी ४६ लाख १९ हजार ६०० रुपयांची ही दंडात्मक रक्कम निश्चित करण्यात आली असून,ती सरकारी तिजोरीत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.या कारवाईमुळे कुरखेडा परिसरातील वाळूमाफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

