सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जगंलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या चार महिलाचा वाघाच्या हल्ल्यात जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
सिंदेवाही : दिनांक,22/05/2026 शुक्रवारीळ सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही परिसरात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या महिलांवर वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या भीषण हल्ल्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून गावात तणावाची स्थिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळ्याच्या हंगामात तेंदूपत्ता संकलनाला सुरुवात झाल्याने ग्रामीण भागातील महिला व पुरुष मोठ्या प्रमाणावर जंगलात जात आहेत.शुक्रवारी 23 मे रोजी पहाटेच्या सुमारास गुंजेवाही गावातील काही महिला तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या.सकाळी अंदाजे 8:00. वा.च्या दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार,महिलांना कोणतीही संधी न देता वाघाने सलग हल्ले केले.या हल्ल्यात चारही महिलांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून जंगल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस पथकाने परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू केला.वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या चार महिलांची नावे : -
1) कवडूबाई दादाजी मोहुर्ले वय,45 वर्ष
2) अनुबाई दादाजी मोहुर्ले वय,46 वर्ष
3) संगीता संतोष चौधरी वय,36 वर्ष
4) सुनीता कौशिक मोहुर्ले वय,33 वर्ष
एकाच वेळी चार महिलांचा बळी गेल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. वन विभागाने नागरिकांना जंगल परिसरात सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले असून संबंधित भागात गस्त वाढविण्यात आली आहे.
या घटनेमुळे सिंदेवाही तालुक्यासह संपूर्ण परिसर हादरला असून तेंदूपत्ता हंगामादरम्यान जंगलात जाणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

