सावली तालुक्यातील सोनापूर येथे मका पिकाला लागलेली आग विझविताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू ; गावावर शोककळा.
एस.के.24 तास
सोनापूर : दिनांक,20/05/2026 बुधवार ला 2:00 ते ते 3:00 वा.सावली तालुक्यातील सोनापूर गावात आज दुपारच्या सुमारास अत्यंत हृदयद्रावक घटना घडली.मक्याच्या शेताला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात शेतकरी साईनाथ नामदेव उडान वय,42 वर्ष यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत असून शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सध्या परिसरात शेतातील काडी-कचरा जाळण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.दरम्यान, सोनापूर शेतशिवारात कुणीतरी आपल्या शेतात आग लावली होती.जोरदार वाऱ्यामुळे ही आग हळूहळू पसरत जाऊन साईनाथ उडान यांच्या मका काढून ठेवलेल्या शेतापर्यंत पोहोचली. काही क्षणातच शेतातील सुकलेल्या अवशेषांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
डोळ्यांसमोर मेहनतीने तयार केलेले पीक जळताना पाहून साईनाथ उडान यांनी स्वतःच आग विझविण्यासाठी धाव घेतली.दुपारचे कडक ऊन आणि वाढती आग यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. आग विझविताना त्यांना आगीचे तसेच उन्हाचे तीव्र चटके बसले. प्रकृती गंभीर झाल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे हलविण्याचा प्रयत्न केला.मात्र रुग्णालयात नेत असतानाच वाटेत त्यांचा मृत्यू झाला.
या अचानक घडलेल्या घटनेमुळे उडान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. साईनाथ उडान हे मेहनती व शांत स्वभावाचे शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनाने गावाने एक कष्टाळू शेतकरी गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर शेतातील काडी - कचरा जाळताना योग्य खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.उन्हाळ्याच्या दिवसांत आणि वाऱ्याच्या वातावरणात लागणारी आग काही क्षणांत मोठे नुकसान करू शकते, त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी,असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

