कंत्राटदार पतीने इंजिनिअर पत्नीला जेवणात दिली विभूती ; लग्नानंतर सुशिक्षित कुटुंबात छळ सुरू,भोंदू बाबाच्या नादी लागल्याने नागपूरच्या तरुणीचा मृत्यू.
📍चामोर्शी तालुक्यातील हरणघाटच्या भोंदू महाराजावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ; महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) गडचिरोली आक्रमक पोलीस अधीक्षकांना निवेदन.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
गडचिरोली : विज्ञानाच्या 21 व्या युगातही समाजातील अंधश्रद्धेचा प्रभाव किती खोलवर रुजलेला आहे.याचे एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारे ताजे उदाहरण गडचिरोली शहरात समोर आले आहे.येथील एका सुशिक्षित कंत्राटदार पतीने आपल्या उच्चशिक्षित इंजिनिअर पत्नीला वैद्यकीय उपचारांऐवजी भोंदू बाबाच्या नादी लावून, जेवणातून " विभूती " दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
सततच्या मानसिक व धार्मिक त्रासामुळे अखेर या इंजिनिअर तरुणीचा नागपूर येथे मृत्यू झाला. याप्रकरणी हरणघाट येथील भोंदू महाराज आणि कंत्राटदार पतीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (अंनिस) केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॉम्प्लेक्स गडचिरोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयातून सेवानिवृत्त झालेले गंदेवार यांचा मुलगा (व्यवसायाने कंत्राटदार) याचा विवाह 20 नोव्हेंबर 2021 रोजी नागपूर येथील रहिवासी व व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या रिया गंदेवार हिच्याशी झाला होता.दोन्ही कुटुंबे उच्चशिक्षित आणि प्रतिष्ठित आहेत.
परंतु, लग्नानंतर काही दिवसांतच रिया हिला मानसिक नैराश्याचा (Depression) त्रास सुरू झाला.अशा गंभीर आजारात तिला तातडीने मानसोपचार तज्ज्ञांकडे नेणे गरजेचे असताना, सासरच्या मंडळींनी अंधश्रद्धेचा मार्ग निवडला.
जेवणात गुपचूप " विभूती " आणि भोंदू बाबाचा दबाव : -
रियाच्या आईने केलेल्या गंभीर आरोपानुसार, रियावर सासरच्या मंडळींकडून वैद्यकीय उपचारांऐवजी चामोर्शी तालुक्यातील चपराळा येथील कार्तिक स्वामी किंवा हरणघाट येथील एका धार्मिक भोंदू महाराजाकडे राहण्यासाठी सतत दबाव टाकला जात होता.
इतकेच नव्हे तर,तिच्या जेवणामध्ये गुपचूप " विभूती " (अंगारा) टाकली जात असे. " दोघांची कुंडली जुळलेली नाही, त्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपत्यांवर याचा वाईट परिणाम होईल," अशी अंधश्रद्धा सासरच्या लोकांकडून पसरवली जात होती.
वैद्यकीय उपचारांअभावी नागपूर येथे मृत्यू : -
सासरच्या लोकांच्या या सततच्या छळाला आणि अंधश्रद्धेच्या जाचाला कंटाळून रिया नागपूर येथे आपल्या आईकडे राहायला गेली होती. दरम्यान, आजारपणात योग्य वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती खालावत गेली आणि अखेर 14 एप्रिल 2026 रोजी तिचा मृत्यू झाला.रियाच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ व पोस्ट व्हायरल झाल्याने हे संपूर्ण प्रकरण चव्हाट्यावर आले आणि जिल्ह्यात खळबळ उडाली.
अंनिस गडचिरोलीची गुन्हे दाखल करण्याची मागणी : -
" काही वर्षांपूर्वी भोंदू बाबा अशोक खरात याने केलेल्या प्रकरणासारखाच हा अत्यंत गंभीर प्रकार गडचिरोली जिल्ह्यात घडला आहे. दोन्ही कुटुंबे सुशिक्षित असतानाही मानसिक उपचारांऐवजी धार्मिक आणि भोंदूगिरीकडे वळणे हा समाजासाठी मोठा प्रश्नचिन्ह आहे. या प्रकरणात रिया गंदेवार हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या हरणघाट येथील भोंदू महाराज आणि तिचा कंत्राटदार पती या दोघांवरही जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत तात्काळ गुन्हे दाखल करावेत." - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,गडचिरोली
प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून पीडितेला न्याय द्यावा आणि जिल्ह्यात सक्रिय असलेल्या भोंदू बाबांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्व स्तरातून होत आहे.

