गोटूल पेंढरी येथे CRY DI गडचिरोली यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय समन्वय सभेचे यशस्वी आयोजन.

गोटूल पेंढरी येथे CRY DI गडचिरोली यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय समन्वय सभेचे यशस्वी आयोजन. 


एस.के.24 तास


धानोरा : पेंढरी ता.धानोरा गोटूल, पेंढरी येथे CRY संस्था - DI गडचिरोली यांच्या पुढाकाराने तालुकास्तरीय समन्वय सभेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.आरोग्य व पोषण विषयक सेवा गाव पातळीवर अधिक प्रभावी,पारदर्शक आणि वेळेवर लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात तसेच विविध विभागांमधील समन्वय अधिक मजबूत व्हावा,या उद्देशाने ही सभा आयोजित करण्यात आली होती.


या सभेस THO धानोरा डॉ.हेमके, CDPO गेडाम मॅडम व MO डॉ.हिचामी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अंगणवाडी सेविका, आशा व ANM कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्षेत्रीय पातळीवरील अनुभव, अडचणी आणि यशस्वी उपक्रम यांची मांडणी केली. विविध विभागांतील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी एकाच व्यासपीठावर येऊन संवाद साधत असल्यामुळे बैठक अत्यंत फलदायी ठरली.



कार्यक्रमाचे संचालन कृष्णकांत घोगरे (MIS कॉर्डिनेटर, CRY) यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस अंकुश राठोड (प्रोग्रॅम लीड, CRY) यांनी प्रास्ताविकातून सभेचा उद्देश स्पष्ट करत आरोग्य व पोषण क्षेत्रातील आंतरविभागीय समन्वय, नियमित आढावा व क्षेत्रीय पातळीवरील उत्तरदायित्व यांचे महत्त्व अधोरेखित केले.


सभेमध्ये गर्भवती व स्तनदा मातांची नोंदणी शंभर टक्के करणे, ANC व PNC सेवा अधिक सक्षम करणे, बालकांचे संपूर्ण लसीकरण पूर्ण करणे, कुपोषित बालकांची वेळेवर ओळख पटवून त्यांचे योग्य आरोग्य संस्थेकडे रेफरल करणे, तसेच संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली. सेवा वितरणातील अडथळे ओळखून त्यावर तातडीने उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला.


यावेळी मार्गदर्शन करताना THO धानोरा डॉ. हेमके यांनी “माता समिती” हा एक प्रभावी व यशस्वी प्रयोग असल्याचे नमूद केले. हा उपक्रम संपूर्ण धानोरा तालुक्यात राबविण्यात यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. माता समितीच्या माध्यमातून गाव पातळीवर मातांचा सक्रिय सहभाग वाढून आरोग्य, पोषण व स्वच्छता विषयक जनजागृती अधिक प्रभावी होईल तसेच कुपोषण प्रतिबंधात सकारात्मक परिणाम दिसून येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.


तसेच कुपोषित बालकांना तात्काळ व योग्य उपचार मिळावेत यासाठी एन.आर.आर.एच.धानोरा येथे रेफर करण्याबाबत अधिकृत पत्रक जारी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी कुपोषित बालकांची ओळख पटताच विलंब न करता संबंधित आरोग्य संस्थेत दाखल करण्यासाठी सक्रिय समन्वय साधावा, असे निर्देश देण्यात आले.


या कार्यक्रमास CRY DI गडचिरोली येथील कम्युनिटी फॅसिलिटेटर राजेंद्र गुरनुले,धनश्री अंबादे,ईश्वर आतला,सावंत सहारे आणि काजल कुमरे उपस्थित होते. तसेच जारावंडी टीममधून संघरत्न खोब्रागडे, सुस्मित कोडापे आणि मोहित वाकडे यांनीही सक्रिय सहभाग घेतला. नियोजन, समन्वय व अंमलबजावणी प्रक्रियेत सर्व टीम सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.


बैठकीदरम्यान अंगणवाडी सेविका, आशा व ANM यांनी नियमित घरभेटी वाढविणे, उच्च जोखमीच्या लाभार्थ्यांची अद्ययावत यादी ठेवणे,कुपोषण प्रतिबंधासाठी प्रभावी जनजागृती मोहिमा राबविणे आणि माता समितीच्या माध्यमातून समुदायाचा सहभाग वाढविण्याचा निर्धार व्यक्त केला. विभागीय पातळीवर माहितीची देवाण-घेवाण अधिक सुलभ करून अडचणी त्वरित सोडविण्याचेही ठरविण्यात आले.


कार्यक्रमाच्या शेवटी विकास गंडाते (अडमिन, CRY) यांनी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, कर्मचारी व सहभागींचे आभार मानले.ही तालुकास्तरीय समन्वय सभा आरोग्य व पोषण क्षेत्रातील सेवा वितरण अधिक परिणामकारक, समन्वयित आणि प्रभावी करण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !