अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यातील पातागुडम येथे एक गाव,एक वाचनालय चे लोकार्पण.
एस.के.24 तास
सिरोंचा : जिल्हा पोलीस दलाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या एक गाव,एक वाचनालय या उपक्रमाला आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत मौजा पातागुडम येथे ७५ व्या सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण उत्साहात पार पडले.अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व नागरिकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाअंतर्गत सिरोंचा उपविभागातील पातागुडम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा पातागुडम येथे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा सार्वजनिक वाचनालयाची स्थापना करण्यात आली आहे.
१७ मार्च २०२६ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा संदेश नाईक यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला २०० हून अधिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.विशेष म्हणजे गडचिरोली पोलीस दल, एसआरपीएफचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांच्या श्रमदान आणि लोकवर्गणीतून हे आधुनिक वाचनालय उभारण्यात आले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत शालेय विद्यार्थी व नागरिकांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून पारंपारिक वाद्यांच्या गजरात उत्साहाने सहभाग नोंदवला. या उपक्रमातून वाचन संस्कृतीबाबत जनजागृती करण्यात आली.
वाचनालयामध्ये स्वतंत्र अभ्यासिका, टेबल-खुर्च्या, पुस्तकांचे कपाट तसेच विविध विषयांवरील व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामुळे परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अनुकूल वातावरण मिळणार असून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळणार आहे.
सन २०२३ पासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७४ वाचनालयांची स्थापना करण्यात आली. त्याचा लाभ ९ हजारांहून अधिक युवक-युवती व नागरिकांना झाला आहे. तसेच या माध्यमातून २०५ विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळविण्यात यश संपादन केले आहे.

