नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाने तीन जवान शहीद ; एक जवान गंभीर जखमी.

नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाने तीन जवान शहीद ; एक जवान गंभीर जखमी.


एस.के.24 तास 


गडचिरोली : छत्तीसगडमधील नक्षलवादाचा पूर्णपणे बीमोड झाल्याच्या घोषणेला काही काळ उलटत नाही तोच,कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाने तीन जवानांचा बळी घेतला आहे. कांकेर - नारायणपूर सीमावर्ती भागात " आयईडी " निकामी करण्याच्या मोहिमेवर असताना झालेल्या भीषण स्फोटात " जिल्हा रिझर्व्ह गार्ड " चे (डीआरजी) तीन जवान शहीद झाले. 


एक जवान गंभीर जखमी झाला आहे.३१ मार्च रोजी राज्य नक्षलमुक्त झाल्याच्या अधिकृत घोषणेनंतर सुरक्षा दलांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.बस्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सुंदरराज पट्टिलिंगम यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांत अनेक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती.या नक्षलवाद्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बस्तरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि भूसुरुंग पेरून ठेवण्यात आले आहेत. 


ही स्फोटके शोधून ती निकामी करण्यासाठी जिल्हा पोलीस आणि डीआरजी जवानांची एक विशेष तुकडी छोटेबेठिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘डी-माइनिंग’ मोहीम राबवत होती. ही मोहीम सुरू असतानाच एका जिवंत भूसुरुंगाचा जोरदार स्फोट झाला.


या स्फोटात चार जवान गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान डीआरजी प्रभारी सुखराम वट्टी, कृष्णा कोमरा आणि संजय गढपाले यांची प्राणज्योत मालवली. परमानंद कोमरा हे या घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


राज्य सरकारने ३१ मार्च रोजी छत्तीसगडला सशस्त्र नक्षलवाद्यांपासून मुक्त घोषित केले होते. मात्र, नक्षलवाद्यांनी भूतकाळात जंगलात पेरून ठेवलेली ही स्फोटके आजही सुरक्षा दलांसाठी आणि स्थानिक नागरिकांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. पोलीस अधीक्षक निखिल राखेचा यांनी सांगितले की, जुन्या माहितीच्या आधारे ही शोधमोहीम राबवली जात होती. 


A१या दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा दलांनी तातडीने नाकाबंदी केली.नक्षलवाद्यांच्या गुप्त हालचालींचा वेध घेण्यासाठी अधिक कुमक तैनात करण्यात आली आहे. जंगलात पेरलेली ही गुप्त स्फोटके शोधणे हे आता प्रशासनासमोरचे मोठे आव्हान असून, या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणा पुन्हा एकदा हाय अलर्टवर आल्या आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !