गर्देवाडा ग्रामपंचायत निवडणुकीत भाकपाचा झेंडा फडकला.5 पैकी 3 जागांवर विजय.
एस.के.24 तास
एटापल्ली : तालुका एटापल्ली अंतर्गत गर्देवाडा ग्रामपंचायत निवडणूक 2026 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) ने दमदार कामगिरी करत 5 पैकी 3 जागांवर विजय मिळवला आहे. या निकालामुळे गावात भाकपाचा लाल झेंडा पुन्हा एकदा फडकला आहे.उर्वरित जागांपैकी एका जागेवर दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्याने निकाल ईश्वर चिट्ठीद्वारे लावण्यात आला.या प्रक्रियेत ती जागा विरोधी गटाच्या बाजूने गेली.
निवडणुकीदरम्यान विरोधी गटाने मोठ्या प्रमाणात धनाचा व इतर साधनसामग्रीचा गैरवापर केल्याचा आरोप भाकपाने केला आहे। तसेच शासन साहाय्याने चालणाऱ्या आश्रम शाळेतील कर्मचारी व शिक्षकांचा गैरवापर निवडणुकीत करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
भाकपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,या सर्व प्रकारांची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लवकरच करण्यात येणार आहे.यासोबतच संबंधित आश्रम शाळेतील कर्मचारी व शिक्षकांवर चौकशी लावून त्यांना नोकरीतून काढण्याची मागणीही करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विरोधकांच्या दबाव आणि गैरप्रकारांना न जुमानता गावातील जनतेने भाकपावर विश्वास दाखवत लाल झेंड्याला पसंती दिली,अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
“ ग्रामपंचायतमधील नागरिकांनी आपल्या गावातील कोणतीही समस्या घेऊन आमच्याकडे यावे.जनतेच्या प्रश्नांचे निराकरण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत,” असे कॉ.सचिन मोतकुरवार यांनी सांगितले. - कॉ.सचिन मोतकुरवार

