आरमोरी - गडचिरोली मार्गावरील चुरमुरा ते वसा मध्यभागी अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू.
📍मृताची ओळख पटवण्याचे आवाहन..!
एस.के.24 तास
गडचिरोली : आरमोरी ते गडचिरोली मुख्य मार्गावरील मौजा चुरमुरा गावाजवळ आज पहाटे एक भीषण अपघात घडला.एका अज्ञात भरधाव वाहनाने पादचाऱ्याला जोरदार धडक दिली, ज्यात सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला.धडक दिल्यानंतर वाहनचालक गाडीसह घटनास्थळावरून फरार झाला असून,पोलीस आता या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास मौजा चुरमुरा गावाजवळील रस्त्यावरून एक इसम पायी जात होता.यावेळी आरमोरीकडून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या व्यक्तीला भीषण धडक दिली. धडक इतकी जोरात होती की,संबंधित व्यक्तीचा जागीच प्राण गेला.
अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती. मृताची ओळख अद्याप अस्पष्ट असून, सदर मृत व्यक्तीकडे ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र आढळून आलेले नाही.त्यामुळे या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
पोलिसांचे आवाहन : -
जर कोणाकडे या अपघाताबाबत माहिती असेल किंवा आपल्या परिसरातील कोणी व्यक्ती बेपत्ता असेल, तर त्यांनी त्वरित नजीकच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पुढील तपास सुरू : -
अज्ञात वाहनचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या मार्गावर वाहनांचा वेग अनियंत्रित असल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.

