जि.प.शाळेत शिक्षक असलेल्या पतीची नोकरी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी या लालसेतून 1 लाख रुपयांत पत्नीनेच पतीच्या खुनासाठी दिली सुपारी ; 4 आरोपी अटकेत.

जि.प.शाळेत शिक्षक असलेल्या पतीची नोकरी अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी या लालसेतून 1 लाख रुपयांत पत्नीनेच पतीच्या खुनासाठी दिली सुपारी ; 4 आरोपी अटकेत.


एस.के.24 तास 


भद्रावती : एक लाख रुपयांत सुपारी देऊन पत्नीनेच पती रवींद्र कुळमेथे यांचा खून केल्याची धक्कादायक घटना भद्रावती पोलिसांच्या तपासात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी दिपमाला रवींद्र कुळमेथे, वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी या चार आरोपींना अटक केली. जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या पतीची नोकरी अनुकंपा तत्त्वावर आपल्याला मिळणार, या लालसेतून पत्नीनेच पतीची हत्या केल्याचे तपासात समोर आले.


भद्रावती तालुक्यातील घोडपेठ येथील कर्मवीर शाळेजवळ, हनुमान मंदिराशेजारी २ मे रोजी एका व्यक्तीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता.गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रवींद्र तुळशिराम कुळमेथे (४६) यांचा मृतदेह असल्याचे पोलीस चौकशीत समोर आले. सखोल चौकशीत धक्कादायक सत्य समोर आले.


मृताची पत्नी दिपमाला कुळमेथे हिनेच पतीच्या खुनासाठी वर्षा परचाके, सोनू उर्फ प्रवीण कालोकर आणि नाझीर अंसारी या तिघांना १ लाख रुपयांची सुपारी दिली होती. १ मे रोजी तिन्ही आरोपींनी कुळमेथे यांना कारमध्ये बसवून घोडपेठ येथे एका निर्जनस्थळी नेले. तेथे कारमध्येच त्याचा गळा आवळून खून करण्यात आला आणि मृतदेह घटनास्थळी टाकून आरोपी पसार झाले.


भद्रावती पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत आरोपी दिपमाला कुळमेथे व वर्षा परचाके या दोघींना वरोरा येथून, तर सोनू उर्फ प्रविण कालोकर व नाझीर अंसारी यांना नागपूर येथून अटक केली.आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती कंपनीची कार (एम.एच ३१ डीसी ८९१९) व तीन मोबाईल जप्त करण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.


रवींद्र कुळमेथे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. पती - पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती. तसेच शिक्षक पती दोन वर्षापासून शाळेत जात नव्हता. अशातच पतीची हत्या केल्यानंतर अनुकंपा तत्त्वावर शासकीय नोकरी मिळेल,या लालसेतूनच पत्नीने पतीचा खून केल्याची माहिती समोर आली आहे.


ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा दिनकर ठोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी (पो.ठा. भद्रावती), निरीक्षक अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा),


सहाय्यक पोलीस निरीक्षक बलराम झाडोकार, उपनिरीक्षक सर्वेश बेलसरे, उपनिरीक्षक निबोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विरेन्द्र केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा, महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गेडाम यांनी पार पाडली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !