ग्रामपंचायत अ-हेरनवरगांव येथील गैरप्रकारा विरोधात आमरण उपोषण.
📍उपोषणाचा ०४ था दिवस. दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली,प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा.
एस.के.24 तास
ब्रह्मपुरी - ०३/०४/२६ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील ग्रामपंचायत मध्ये झालेल्य आर्थिक गैरव्यवहारात बनावट कामे , बनावट कामाचा मस्टर ,बोगस वृक्षारोपण, घरकुल वाटपात गैरप्रकार आणि नियमबाह्य निर्णयाविरोधात सुरू करण्यात आलेल्या बेमुदत आमरण उपोषणाचा आजचा ०४ था दिवस सुरू आहे. प्रशासनाला झालेल्या भ्रष्टाचाराबाबत वेळोवेळी माहिती देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष करून ग्रामपंचायत भ्रष्टाचाराची चौकशी न केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिलारे व नवतरुण सामाजिक कार्यकर्ते साहिल पिलारे यांनी बेमुदत आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आणि ते आमरण उपोषणाला पंचायत समिती कार्यालयाजवळ दिनांक ३०/०३/२६ पासून बसले.
आज उपोषणाचा चौथा दिवस असून अद्याप प्रशासना कडुन कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही.जो पर्यंत आमच्या मागण्यांची निष्पक्ष चौकशी होऊन अ-हेनवरगांव वाशीयांना न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवू असे ठामपणे उपोषणकर्त्यांनी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय ,चंद्रपूर येथे सादर करण्यात आलेल्या निवेदनात ग्रामपंचायतमधील विविध गैरप्रकारचा उल्लेख करण्यात आला आहे .यामध्ये नाली बांधकाम , वृक्षारोपण ,सोलर दिवे बसवणे , घरकुल वाटप गैरप्रकार, नाली बांधकाम, आरओ दुरुस्ती,सार्वजनिक शौचालय बांधकाम तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग यासारख्या विकास कामांमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे. सॅनिटरी पॅड खरेदीत मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय कमी किमतीच्या वस्तू जास्त दरात खरेदी करणे,ग्राम निधीचा मनमानी वापर ,माहिती अधिकारांतर्गत मागितलेली माहिती देण्यास जाणून बुजून विलंब करणे किंवा अपूर्ण माहिती देणे तसेच मासिक सभेचे ठराव मंजूर नसतानाही कामे मंजूर केल्याचे आरोप करण्यात आले आहे.
काही ठिकाणी बनावट नमुने तयार करून मंजुरी घेतल्याचे मुद्दा पुढे आला आहे. उपोषणकर्त्यांनी या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि सरपंच व सचिवावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.
2021 ते 2026 या कालावधीत झालेल्या सर्व कामाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून शासन निधीची वसुली करावी अशी मागणी पत्रकार परिषदेत उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत (बंडू) पिलारे व सामाजिक कार्यकर्ते साहिल पिलारे यांनी केली आहे.

