तीन महिन्यांपूर्वीच्या वादाचा रक्तरंजित शेवट..! 📍विसापूरात 17 वर्षीय युवकाची निघृण हत्या; 24 तासांत विधी संघर्ष बालकासह पाच आरोपी जेरबंद..!

तीन महिन्यांपूर्वीच्या वादाचा रक्तरंजित शेवट..!


📍विसापूरात 17 वर्षीय युवकाची निघृण हत्या; 24 तासांत विधी संघर्ष बालकासह पाच आरोपी जेरबंद..!


एस.के.24 तास 


बल्लारपूर : तीन महिन्यांपूर्वी झालेल्या जुन्या वादाचे शुक्रवारी भीषण रूप समोर आले आहे. विसापूर येथे 17 वर्षीय युवकाची धारदार शस्त्रांनी वार करुन आणि दगडाने डोके ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात बल्लारपूर पोलिसांनी तत्पर कारवाई करत अवघ्या 24 तासांत एका विधी संघर्ष बालकासह पाच आरोपींना नागपूर येथून ताब्यात घेत मोठे यश मिळविले आहे. 

मृत युवकाचे नाव विराज राजेश आगदरी वय,17 वर्ष रा. किल्ला वॉर्ड,बल्लारपूर असे असून तो अल्पवयीन असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अटकेत घेतलेल्या आरोपींमध्ये मोनू उर्फ रौनक सुखपाल निषाद (19), आकाश रामकरन निषाद (21) दोघेही रा. भगतसिंग वॉर्ड, जिशान शरीफ सिद्दीकी (19, रा. सुभाष वॉर्ड), समीर कलीम खान (21, वर्ष दादाभाई नौरोजी वॉर्ड) तसेच एका विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज आणि आरोपी यांच्यात सुमारे तीन महिन्यांपूर्वी किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये सतत तणावाचे वातावरण होते. शुक्रवारी सायंकाळी विराज हा आपल्या मित्रांसह विसापूर येथील तुकडोजी चौकातील एका हेअर सलूनमध्ये गेला असता आरोपी दोन दुचाकींवर तेथे पोहोचले.त्यांच्या हातात धारदार शस्त्रे पाहताच विराजसह इतर युवकांनी पळ काढला.

आरोपींनी विराजचा पाठलाग करत महात्मा फुले चौक ते सुरभी चौक मार्गावर त्याला गाठले.त्यानंतर त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले.एवढ्यावरच न थांबता गंभीर जखमी झालेल्या विराजच्या डोक्यावर दगडाने वार करुन आरोपींनी त्याची निघृण हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. हल्ल्यानंतर आरोपी दुचाकी आणि मोपेडवरुन पसार झाले होते.

घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तातडीने तीन विशेष पथके तयार केली,तर स्थानिक गुन्हे शाखेची दोन पथकेही तपासासाठी रवाना करण्यात आली.तांत्रिक विश्लेषण,सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी घुग्घुस,वरोरा मार्गे नागपूर येथे शोधमोहीम राबवत सर्व आरोपींना ताब्यात घेतले. 

घटनास्थळी पोलीस अधीक्षक आयुष निपाणी तसेच अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी भेट देऊन, तपासाचा आढावा घेतला. घटनेनंतर बल्लारपूर पोलीसांना ॲक्टिव्ह मोडमध्ये येत अवघ्या 24 तासांत आरोपींना बेड्या ठोकण्यात यश मिळाले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे करीत आहेत.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !