इन्व्हर्टरही बंद पडल्याने व्हेंटिलेटर थांबले.परिणामी ऑक्सिजनअभावी बाळाचा मृत्यू ; गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयातील प्रकार.
📍दीड तास रुग्णवाहिकेसाठी ताटकळत ; जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा उघड.
एस.के.24 तास
गडचिरोली : येथील महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवेतील गंभीर त्रुटींमुळे एका नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक आरोप पालकांनी केला आहे मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाला प्रथम दीड तास रुग्णवाहिकेसाठी ताटकळावे लागले,त्यानंतर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असतानाच वीजपुरवठा खंडित झाला.
इन्व्हर्टरही बंद पडल्याने व्हेंटिलेटर थांबले.परिणामी ऑक्सिजनअभावी बाळाचा मृत्यू झाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.या घटनेमुळे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचे विदारक वास्तव पुन्हा एकदा उघड झाले आहे.
कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील संजना संदीप कुमरे (२३) यांना प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर ११ मे रोजी गडचिरोलीच्या महिला व बाल रुग्णालयात दाखल करण्यात आले.दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, जन्मानंतर काही तासांतच बाळाची प्रकृती खालावू लागली. सायंकाळी साडेसातच्या सुमारास डॉक्टरांनी परिस्थिती गंभीर असल्याचे सांगत बाळाला तातडीने चंद्रपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला.
जिल्हा मुख्यालयातही रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नातेवाईकांची धावपळ सुरू झाली. '१०८' आपत्कालीन सेवेशी संपर्क साधल्यानंतर 'रुग्णवाहिका पोहोचण्यास किमान दोन तास लागतील' असे उत्तर मिळाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. दीड तास प्रतीक्षा करूनही वाहन न मिळाल्याने अखेर बाळाला नवजात शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असतानाच रुग्णालयातील वीजपुरवठा खंडित झाला.बाळाचे वडील संदीप कुमरे यांनी केलेल्या आरोपानुसार, तब्बल दीड तास वीज नव्हती आणि बॅकअपसाठी असलेले इन्व्हर्टरही निकामी ठरले. त्यामुळे व्हेंटिलेटर बंद पडले आणि ऑक्सिजनअभावी बाळाचा मृत्यू झाला. या आरोपांमुळे रुग्णालय प्रशासनाच्या आपत्कालीन यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
वीज गेल्यानंतर योग्य बॅकअप व्यवस्था का नव्हती, असा सवाल संदीप कुमरे यांनी संबंधित डॉक्टरांना केला असता, मला काही सांगू नका, व्यवस्थापनालाच विचारा, असे उत्तर मिळाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.
महिला व बाल रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ. प्रशांत पेंदाम यांनी उपचारात हलगर्जी झाल्याचे आरोप फेटाळले. मुदतपूर्व प्रसूती झाल्याने बाळाचे वजन कमी होते आणि प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारात कोणतीही हलगर्जी झालेली नाही. डॉक्टरांनी नातेवाईकांशी अयोग्य पद्धतीने संवाद साधला असेल, तर त्याची चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नासिर हाशमी यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. डॉक्टरांनी आधी चंद्रपूरला रेफर करण्याचा सल्ला दिला आणि नंतर त्याच रुग्णालयात उपचार सुरू केले.जर येथे उपचार शक्य होते, तर रेफरचा निर्णय का घेतला, रुग्णवाहिका उपलब्ध का झाली नाही, नातेवाईकांचे आरोप अत्यंत गंभीर आहेत. दोषींवर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

