चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बाप - लेकाचा जागीच मृत्यू.
एस.के.24 तास
चंद्रपूर : जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना थंडावा मिळावा म्हणून नागरिकांकडून घराघरांत कुलरचा वापर वाढला आहे. मात्र कुलरमुळे जीवघेणी दुर्घटना घडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी चंद्रपूर शहरात घडली.चालू कुलरमध्ये पाणी टाकताना विजेचा धक्का लागून बाप - लेकाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास शहरातील इंदिरानगर रेल्वे मार्गाजवळ घडली. वामन मांडवे हे घरातील कुलरमध्ये पाणी टाकत असताना त्यांना अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. ते खाली कोसळले.
वडिलांना खाली पडलेले पाहून मुलगा राहुल मांडवे मदतीसाठी त्यांच्या जवळ गेला. मात्र त्यालाही विजेचा जोरदार धक्का बसल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला,अशी माहिती पोलिसांनी दिली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांनाही तत्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे इंदिरानगर परिसरात शोककळा पसरली आहे.उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून नागरिकांना विद्युत उपकरणांच्या वापराबाबत वारंवार सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
कुलर,पंखे व अन्य उपकरणांची वायरिंग तपासून घ्यावी,तसेच चालू कुलरमध्ये पाणी टाकताना मुख्य स्विच बंद करावा, असे आवाहन महावितरणने केले होते.या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने ही दुर्घटना घडल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या घटनेनंतर नागरिकांनी घरातील विद्युत उपकरणांचा वापर करताना अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

