लाल सलाम ?, "𝗝𝗦𝗪 " च्या अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी ; संशयास्पद पत्रकामुळे खळबळ.
📍तांत्रिक तपासाला वेग ; पोलिसांची सतर्कता वाढली.
एस.के.24 तास
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील वटेली परिसरात लोहखनिज उत्खननासाठी हालचाली सुरू केलेल्या " जेएसडब्ल्यू " कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठार मारण्याची धमकी देणारे पत्रक आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. " लाल सलाम " असा उल्लेख असलेल्या या पत्रकातून कंपनीने तातडीने कामकाज थांबवून परिसर सोडावा असा इशारा देण्यात आला आहे.
संबंधित भागात नक्षलवादी हालचालींचा अभाव आणि ग्रामस्थांकडूनही कोणताही उघड विरोध नसल्याने हा प्रकार खोडसाळपणातून घडवून आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून एटापल्ली तालुक्यात प्रस्तावित खाण प्रकल्पांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे. अशातच वटेली परिसरात नक्षलवादी शैलीतील पत्रक आढळून आले. या पत्रकात " JSW " कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा थेट उल्लेख करत त्यांना गंभीर परिणामांची धमकी देण्यात आली आहे. पत्रकाच्या शेवटी " लाल सलाम "असा उल्लेख करून दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
वटेली व लगतच्या परिसरात अलीकडच्या काळात नक्षलवादी हालचालींची कोणतीही ठोस नोंद नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याशिवाय, संबंधित प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामसभा अथवा ग्रामस्थांनी अधिकृतरीत्या कोणताही ठराव किंवा आंदोलन उभे केलेले नाही. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या नावाचा वापर करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न झाला असावा,असा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील गस्त आणि बंदोबस्त वाढवला आहे. पत्रकाच्या आशयामागील उद्देश, त्याची निर्मिती व वितरण याचा तपास तांत्रिक माध्यमांतून केला जात आहे. विकासकामांमध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी किंवा स्थानिक वातावरण अस्थिर करण्यासाठी हा प्रकार घडवून आणला गेला असावा,या दृष्टीनेही तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वटेली परिसरात आढळलेल्या पत्रकाच्या अनुषंगाने तपास सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार या भागात नक्षलवादी हालचाली आढळून आलेल्या नाहीत. तसेच स्थानिक नागरिकांकडूनही प्रकल्पाला ठोस विरोध दिसून आलेला नाही. त्यामुळे कुण्या बाहेरील व्यक्तीने हेतुपुरस्सर हे कृत्य केले असावे,असा संशय आहे. प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. - योगेश रांजणकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,हेडरी

