📍दोन अभियंता भावंडांनी भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचे समोर.
एस.के.24 तास
गडचिरोली : शहरातील एटीएममध्ये शंभर रुपयांच्या बनावट नोटा जमा करण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासातून आंतरजिल्हा रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे थेट नागपूरपर्यंत पोहोचली असून, दोन अभियंता भावंडांनी भाड्याच्या फ्लॅटमध्ये अत्याधुनिक साधनसामग्रीच्या साहाय्याने बनावट नोटांची छपाई सुरू केल्याचे समोर आले आहे.
गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नागपुरात छापा टाकून या दोघांसह चौघांना अटक केली.
11 मे रोजी कारगिल चौक परिसरातील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएममध्ये शंभर रुपयांच्या 21 नोटा जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.मशीनने या नोटा स्वीकारण्यास नकार दिला. बँकेकडून पडताळणी करण्यात आल्यानंतर त्या सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट झाले.या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रतीक अनासाने यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला.
तपास दरम्यान प्रमोद टिकाराम कोवे वय,23 वर्ष रा.हळदा, ता. ब्रह्मपुरी जिल्हा.चंद्रपूर याच्या खात्यात या नोटा जमा करण्याचा प्रयत्न झाल्याचे निष्पन्न झाले.पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने ही रक्कम गडचिरोलीतील पानटपरी चालक आदित्य रेचनकर (१९) याच्याकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे नागपूरकडे वळवली.
16 मे च्या मध्यरात्री गडचिरोली पोलिसांनी नागपुरातील एका भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकला.या कारवाईत मयूर लक्ष्मीकांत डोईजड वय,31 वर्ष आणि आदित्य लक्ष्मीकांत डोईजड वय, 26 वर्ष या सख्ख्या भावांना अटक करण्यात आली. मयूर हा सिव्हिल इंजिनिअर आहे. तर आदित्य मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून दोघेही गडचिरोलीचे रहिवासी आहेत.
छाप्यामध्ये पोलिसांनी 50,100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटांसह अत्याधुनिक कलर प्रिंटर, बॉण्ड पेपर, कटर आणि इतर साहित्य असा एकूण 39 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फ्लॅटमध्येच बनावट नोटा तयार करून त्या विविध मार्गांनी बाजारात चलनात आणल्या जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
उच्चशिक्षित तरुण गेल्या चार वर्षांपासून बनावट नोटांची छपाई करत असल्याची धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे. आपल्या तांत्रिक ज्ञानाचा वापर त्यांनी गुन्हेगारीसाठी केल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावून गेली आहे. या काळात किती बनावट नोटा बाजारात फिरवल्या गेल्या, तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.डोईजड बंधूंसह आदित्य रेचनकर यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी दिली.या गुन्ह्यात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

