मतदानाला हजारो विद्यार्थी मुकणार. - अमरदीप लोखंडे यांचे मनोगत.
एस.के.24 तास
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगांव दिनांक,१६/११/२४ सध्या महाराष्ट्रात २० नोव्हेंबर २४ रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीला दोन तीन दिवस शिल्लक उरली आहेत.
ज्या ज्या पक्षाचे उमेदवार निवडणुकीला उभी आहेत ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी नामांकित नेत्यांच्या सभा घेऊन मतदारांना वेगवेगळ्या प्रकारची प्रलोभने देऊन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झाडून प्रचार संघर्ष सुरू आहे.येत्या एक-दोन दिवसात आरोप- प्रत्यारोपाच्या प्रचार तोफा या थंड होणार आहेत.
महाराष्ट्र राज्यात निवडणुका घोषित झाल्यानंतर शासनाने मतदान आपला हक्क आहे आणि तो मी मतदान करून बजवणारच यासाठी स्पर्धा,जाहिराती ,कलापथकाच्या द्वारे, शालेय विद्यार्थ्यांच्या घोषवाक्याच्या प्रभात फेरी द्वारे जनजागृती करण्यात आली.
अंथुरणावर खिळलेले वयोवृद्ध मतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी अंथरुणावर खिळलेल्या माणसाच्या मदतनीसाच्याद्वारे मतदान करून घेऊन मतदान प्रक्रिया पूर्ण केली.
परंतु आज राज्यातील खेड्यापासून ते शहरापर्यंतचे हजारो विद्यार्थी शेकडो मैल दूर असलेल्या वैद्यकीय, अभियांत्रिकी अन्य क्षेत्रातील पदवी , पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. तसेच काही विद्यार्थी दुसऱ्या राज्यात कंपनी मध्ये नोकरीला आहेत.कोसो मैल दूर शिक्षण घेत व कंपनीमध्ये नोकरीअसलेल्या या विद्यार्थ्यांना मतदान करण्यासाठी स्व- गावी येणे -जाणे शक्य होत नाही.
शिक्षण व नोकरी करीत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी शासन, निवडणूक आयोग यांनी काहीतरी उपाययोजना करून सदर मतदार विद्यार्थी मतदानापासून वंचित राहणार नाहीत यासाठी त्यांना दिलासा द्यावा त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी खूप मदत होईल.

