मुल तालुक्यातील आदर्शनगर मारोडा येथील महिला वाघाच्या हल्यात ठार.
एस.के.24 तास
मुल : मुल तालुक्यातील सोमनाथ परिसरातील शेतशिवारात कापूस तोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर सुमारे 8:00. वाजताच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून हातोडा गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
मृत महिलेचे नाव सुनीता शामराव भोयर वय,45 वर्ष रा.आदर्शनगर,मारोडा ता.मुल असे असून त्या सकाळी इतर महिलांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक वाघाने झडप घालून त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्याच्या वेळी इतर महिलांनी आरडाओरडा केल्याने वाघाने घटनास्थळावरून पळ काढला.सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मारोडा गावात मिळताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्याशिवाय मृतदेह उचलून शवविच्छेदनासाठी पाठवू देणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली. त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहायक उपवनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी शेंडे तसेच अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी चर्चा सुरू करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.बफर झोनचे गेट तात्काळ बंद करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांनी यावेळी लावून धरली.
वारंवार होणाऱ्या वाघांच्या हल्ल्यांबाबत ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वनविभागाकडून केवळ तात्पुरती उपाययोजना केली जाते मात्र वाघांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने अशा घटना पुन्हा घडत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला.
घटनास्थळी पोलीस व वनाधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत असून ग्रामस्थांना समजावून सांगण्याचे काम सुरू आहे. पुढील कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

