भेंडाळा जमीन अधिग्रहणाविरोधात कष्टकरी जनतेचा इशारा - अन्यायग्रस्तांसोबत भाकपा ठाम.
एस.के.24 तास
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुपीक, सिंचनाखालील व बारमाही पिक देणाऱ्या शेतजमिनींच्या अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू झाल्याने शेतकरी, शेतमजूर व कष्टकरी जनतेत तीव्र असंतोष पसरला आहे. या जमिनीवरच हजारो कुटुंबांचे उदरनिर्वाह अवलंबून असून जमीन गेल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक ग्रामसभांची संमती न घेता आणि प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन, रोजगार व पर्यावरणीय परिणामांविषयी स्पष्ट हमी न देता अधिग्रहणाची प्रक्रिया राबविण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांच्या भवितव्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ.सचिन मोतकुरवार यांनी स्पष्ट भूमिका घेत सांगितले की, “ सुपीक शेतीजमीन हिरावून घेणे म्हणजे कष्टकरी जनतेच्या पोटावर लाथ मारणे होय. अन्यायग्रस्त व प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या बाजूने भाकपा ठामपणे उभी आहे. विकासाच्या नावाखाली भांडवलदारांच्या हितासाठी शेतकरी–शेतमजुरांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. ”
ते पुढे म्हणाले की, “ जमीन, जल व जंगलावर पहिला हक्क हा कष्टकरी जनतेचा आहे. योग्य मोबदला, हमीदार पुनर्वसन, कायमस्वरूपी रोजगार आणि ग्रामसभेची संमती याशिवाय कोणतेही जमीन अधिग्रहण मान्य होणार नाही ” भेंडाळा परिसरातील अन्यायग्रस्त, प्रकल्पग्रस्त शेतकरी व शेतमजूर यांनी आपल्या समस्या व माहिती मांडण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पार्टीशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी - मो.9423660364
भाकपा कष्टकरी जनतेच्या हक्कांसाठी शेवटपर्यंत लढा देईल, असा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

