महिला व बालविकास विभागाकडे योजना हस्तांतरित ; पीएम मातृ वंदना योजनेची नोंदणी बंद लाभार्थी,कर्मचारी त्रस्त.
एस.के.24 तास
गडचिरोली : बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणार्या मातृ वंदना योजनेविषयी संभ्रम कायम आहे.२०१७ पासून ही योजना विभागाकडून आरोग्य राबविण्यात येत होती.१ एप्रिल २०२५ पासून ही योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली.
त्यामुळे या योजनेच्या नोंदणीसाठी देण्यात आलेले युझर आयडी डीअॅक्टिव्हेट करण्यात आले असल्याने नवीन लाभार्थीची नोंदणी प्रक्रिया बंद आहे.यामुळे लाभार्थी, कर्मचारी त्रस्त झाले आहेत.
प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेमध्ये पहिल्या बाळासाठी संबंधित गर्भवतीला शासनाकडून दोन टप्प्यांत पाच हजारांची आर्थिक मदत केली जाते. तर दुसरी मुलगी झाल्यास एकाच टप्प्यात सहा हजार रुपये देण्यात येत आहेत. ही योजना आतापर्यंत आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत होती.
परंतु १ एप्रिलपासून ही योजना महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित केली. परंतु, या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थीची नोंदणी बंद आहे, तर जुन्या लाभार्थीना तांत्रिक अडचणीमुळे निधी मिळालेला नाही. त्यामुळे लाभार्थीसह योजनेतील कर्मचार्यांमध्ये संभ्रम कायम आहे.
कर्मचार्यांच्या मते, शासनाच्या १४ मार्च २०२४ च्या जीआरनुसार हे कर्मचारी मागील १५ वर्षांपासून आरोग्य खात्यात सेवा देत आहेत. त्यांचे आरोग्य विभागात समायोजन करण्यास पात्र आहेत. परंतु त्यावर ठोस निर्णय अजूनही झालेला नसल्याने या योजनेतील कर्मचार्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.