गडचिरोलीकडे निघालेल्या एका कारला चुरचुरा जवळ अचानक भीषण आग ; मुलासह गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला.
एस.के.24 तास
गडचिरोली : सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी देसाईगंज येथून गडचिरोलीकडे निघालेल्या एका कारला चुरचुराजवळ अचानक भीषण आग लागली. इंजिनमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने तत्काळ मुलासह गाडीबाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली असून, घटनेमुळे परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, देसाईगंज येथील रहिवासी अनिल डोंगरवार हे १८ एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास आपली कार (एमएच ३३ व्ही- ४४०३) घेऊन गडचिरोलीच्या दिशेने जात होते. आपल्या मुलाला सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचवण्याची त्यांची लगबग होती. मात्र, चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर अचानक कारच्या ‘बोनट’मधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डोंगरवार यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार रस्त्याच्या कडेला उभी केली. आग पसरण्यापूर्वीच त्यांनी आपल्या मुलासह बाहेर झेप घेतली. ते बाहेर पडताच आगीने रौद्र रूप धारण केले आणि काही क्षणांतच संपूर्ण कार आगीच्या गोळ्यात रूपांतरित झाली.
आगीच्या भीषण ज्वाळांमुळे गडचिरोली मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी रोखण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस वसीम पठाण आणि होमगार्ड मोरेश्वर मेश्राम यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. आरमोरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.गाडीचा केवळ लोखंडी सांगाडा शिल्लक राहिला होता.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. ऐन परीक्षेच्या दिवशी हा प्रसंग ओढवल्याने डोंगरवार कुटुंबीय हादरले असले, तरी सुदैवाने जीवितहानी टळली आहे.

