सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन विभागाने जिवंत कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर. 📍6 आरोपी अटकेत,मुख्य मांत्रिक फरार ; आणखी 10 जण ताब्यात.

सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन विभागाने जिवंत कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर.


📍6 आरोपी अटकेत,मुख्य मांत्रिक फरार ; आणखी 10 जण ताब्यात.


एस.के.24 तास 


सावली : राज्यात भोंदू अशोक खरात प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात अघोरी पूजेतून गुप्तधनाचा शोध,सोन्याची बिस्किटे मिळवणे आणि पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून कुमारी आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात वन विभागाने जिवंत कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला. महिलांचे लैंगिक शोषण झाल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मशानभूमीत अघोरी पूजेचे चित्रीकरण, घुबड आणि कासवांसह अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांची छायाचित्रे,त्यांच्या जन्मकुंडल्या आणि खासगी अवयवांची छायाचित्रे तसेच महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती.

सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी १२ एप्रिल ला दोन जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या गंगाधर बुरांडे,मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हमचंद शेंडे,धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे या सहा आरोपींना अटक केली.आरोपींच्या भ्रमणध्वनीत वन्यजीव तस्करीसोबतच अघोरी पूजेच्या चित्रफिती आणि संदेश दिसून आले.

या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पसरलेले आहे. यात ५० पेक्षा अधिक जण सक्रिय असल्याचे कळते. ते ग्रामीण भागामध्ये शिकार शोधण्याचे काम करायचे आणि महिलांच्या जन्मकुंडल्या, त्यांच्या चित्रफिती मुख्य मांत्रिकाकडे पाठवायचे. मांत्रिकाला ‘टेस्टर’ म्हटले जात होते. एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी योग्य आहे की नाही, हे ‘टेस्टर’ ठरवत असे. त्यानंतर निर्जनस्थळी किंवा स्मशानभूमीत अघोरी विधी पार पाडले जात होते.

पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली श्रीमंत आणि गरीब अशा दोन्ही स्तरांतील लोकांना फसवले जात होते. आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता वनविभागाच्या छाप्यादरम्यान ती बिस्किटे बनावट असल्याचे उघड झाले.

याप्रकरणी सहा आरोपींवर वन गुन्हा नोंदवून त्यांना अटक करण्यात आली. सर्व सहा आरोपी वनकोठडीत असून, मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक अद्याप फरार आहे. हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे असल्याने लवकरच हा तपास पोलीस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून, भोंदूगिरीच्या या विळख्यात आणखी किती महिला अडकल्या आहेत,याबाबत तपास सुरू आहे.

वन विभागाने आणखी दहा जणांना ताब्यात घेतले आहे. अघोरी पूजेच्या या प्रकारात आणखी बरेच जण सहभागी असून त्यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींच्या भ्रमणध्वनींत अघोरी पूजेच्या चित्रफिती आणि छायाचित्रे मिळाली.पूजेसाठी मुली आणि विधवा महिलांचा वापर केला जात होता, असेही तपासात समोर आले आहे,अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी दिली.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !