बाबासाहेबाची धम्मक्रांती पुढे न्या व देश वाचवा : भदन्त हर्षबोधी महास्थवीर : १३५ वा जयंती सोहळा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - १८/०४/२६ " स्वाभीमान,अस्मिता, मुलभूत अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला मिळवून दिलं.आई-वडीलांनी तुम्हाला शिक्षण दिले पण धम्म बाबासाहेबांनी दिला.ते राजनैतिक सत्ता आणण्यासाठी झटले.प्रत्येक माणूस रिपब्लिकन झाला पाहिजे,असे त्यांना वाटे.आज जगाला बुद्धाची गरज आहे.बुध्द धम्म मूर्तीत नाही,विहारात नाही तो आचरणात आहे.
आज बाबासाहेबाचे धर्मांतर साकार करण्याची गरज आहे म्हणून बाबासाहेबाची धम्मक्रांती पुढे न्या व देश वाचवा!" असे आवाहन बुध्दगयाचे भदन्त हर्षबोधी महास्थवीर यांनी केले.ते येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित डॉ बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती उत्सव सोहळ्यातील जाहीर व्याख्यानात अध्यक्षपदावरुन बोलत होते.
विचारमंचावर मुख्य अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालय,दिल्लीचे अँड प्रदीप कुमार,प्रमुख वक्ते म्हणून नागपूर येथील दै. लोकमतचे संपादक श्रीमंत माने,अँड संदिपकुमार सिंग यांच्यासह कवी प्रभूजी राजगडकर,समितीचे अध्यक्ष अशोक रामटेके,उपाध्यक्ष सुधीर अलोने,सचिव डॉ युवराज मेश्राम,सहसचिव सुधाकर पोपटे,कोषाध्यक्ष के.जी.खोब्रागडे,संघटक नेताजी मेश्राम,महिला संघटक छायाताई जांभुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी श्रीमंत माने म्हणाले की,राज्यघटनेवर प्रेम करणा-या मतदारांची या देशातील सत्तेला भिती वाटते.आपल्याला फुले- शाहू -आंबेडकर प्रबोधनाची परंपरा लाभली आहे,ती पुढे न्यावी लागेल.त्यांच्याप्रती कायम कृतज्ञ रहावे लागेल. अँड प्रदीपकुमारांनी, बाबासाहेब समानतेसाठी लढले असून संबंध स्त्रियांना त्यांनी कशी समानता मिळवून दिली? यावर विवेचन केले तर अँड संदिपकुमार सिंग यांनी बाबासाहेबांच्या तेजस्वी व्यक्तिमत्वावर व कार्यावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समितीचे अध्यक्ष अशोक रामटेकेंनी केले. संचालन समिती सचिव डॉ युवराज मेश्राम तर आभार समिती संघटक नेताजी मेश्रामांनी मानले. यशस्वीतेसाठी आसाराम बोदेले,इंजि.विजय मेश्राम, अँड सुभाष मेश्राम, बौध्दरक्षक जांभुळकर,राजू मेश्राम,सूरज नंदेश्वर, अमरदीप मेश्राम,नरेंद्र बांते,डॉ इ.एल.रामटेके, जगदिश मेश्राम,भीमानंद मेश्राम इत्यादींनी मोलाचे सहकार्य केले.कार्यक्रमाला श्रोत्यांनी गर्दी केली होती.


