गडचिरोली शहरातील चामोर्शी मार्गांवरील दोन दिवसात तीन ठिकाणी चोरी.
📍चोरी करणाऱ्यांच्या टोळीत दोन तरुण मुले व दोन मुलींचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्हा मुख्यालय असलेल्या गडचिरोली शहरात अवघ्या दोन दिवसांत चोरट्यांनी एक नव्हे,तर तीन ठिकाणी चोरी केली. यात एक फार्मसी, एक बेकरी आणि एका रेस्टाॅरंटचाही समावेश आहे.शहरातील मुख्य मार्गालगतच्या ठिकाणी झालेल्या या चोऱ्यांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
स्थािनक चामोर्शी महामार्गावरील डॉ.कुंभारे यांच्या धन्वंतरी हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या स्मार्ट केअर फार्मसी मेडिकल शॉपमध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे.चोरट्यांनी या औषधालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. आत ड्राॅव्हरमधील नगदी रक्कम घेऊन पसार झाले.
ही घटना पहाटे ३ वाजताच्या दरम्यान घडली. विशेष म्हणजे याच दरम्यान धानोरा मार्गावरील साई वृंदावन रेस्टाॅरंटमध्येही चोरट्यांनी कुलून तोडून प्रवेश केला.येथे ही काऊंटरमधील रक्कम घेऊन ते पासर झाले.विशेष म्हणजे आदल्या दिवशीच मध्यरात्री चामोर्शी मार्गावरीलच वडेट्टीवार यांच्या कॉम्प्लेक्समधील कृष्णा बेकरी येथेही पहाटेच्या सुमारास कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली होती.
ही घटना ताजी असताना पुन्हा एक नव्हे तर दोन ठिकाणी चोरी करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर व कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.चोरी करणाऱ्यांच्या टोळीत दोन तरुण मुले व दोन मुलींचा समावेश असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून येत आहे.विशेष म्हणजे या चोरट्यांनी चेहरा स्कार्फने पूर्ण झाकला असल्याने त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे दहा दिवसांपूर्वी गोकुलनगर येथील गणेश कॉलनीमध्येसुद्धा दोन घरांचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली होती.तसेच गुजरी परीसरातही चोरी झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे चोरट्यांची टोळीच सक्रीय असून या चोरीच्या घटनांमुळे शहरवासींमध्ये भिती निर्माण झाली आहे.
त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांच्या टोळीचा तत्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.