गडचिरोली तालुक्यातील जेप्रा येथील बोगस डॉक्टरवर मोठी कारवाई.
📍न्यायालयाने सुनावली तीन वर्षांची सक्तमजुरी १.७५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली.
एस.के.24 तास
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली तालुक्यातील जेप्रा गावातील ईश्वर मोहन मारबते या इसमावर बेकायदेशीररीत्या अलोपॅथी औषधांचा साठा बाळगल्याचा आणि डॉक्टर असल्याचा बनाव केल्याचा ठपका ठेवत गडचिरोली येथील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्यास दोषी ठरवले असून,तीन वर्षांची सक्तमजुरी आणि एकूण १.७५ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
१.७५ लाख रुपयांचा दंड : -
दिनांक २१ जून २०२३ रोजी, अन्न व औषध प्रशासनाच्या गडचिरोली विभागाने प्राप्त झालेल्या गोपनीय तक्रारीच्या आधारे जेप्रा येथे ईश्वर मारबते याच्या घरी धाड टाकली असता अलोपॅथी औषधांचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.
या औषधांबाबत कोणतीही खरेदी पावती किंवा विक्रीसाठी परवाना सादर करण्यात आला नाही. तसेच तपासादरम्यान आढळून आले की मारबते यांच्याकडे कोणतीही वैध वैद्यकीय पदवी किंवा अलोपॅथी उपचाराची परवानगी नव्हती.
तपासात हेही स्पष्ट झाले की संबंधित इसमाने ‘इलेक्ट्रो-होमिओपॅथी’ ची पदवी मिळवली होती, परंतु ही पदवी अलोपॅथी औषध विक्री अथवा उपचारांसाठी वैध नाही, असे महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या पत्राद्वारे अधोरेखित करण्यात आले.
ही खटला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. ए. भैसारे यांच्या न्यायालयात चालवण्यात आला. २९ जुलै २०२५ रोजी निकाल देताना न्यायालयाने कलम २७(ग्ग्) अंतर्गत – तीन वर्षांची सक्तमजुरी व १,५०,००० रूपयांचा दंड,कलम २८ अंतर्गत – सहा महिन्यांची सक्तमजुरी व २५,००० रूपयांचा दंड ठोठावला.दोन्ही शिक्षा एकाचवेळी भोगाव्या लागणार आहेत.