आदर्श स्मार्ट ग्राम कळमना तर्फे राज्यभरातील आदर्श गावांचा अभ्यास दौरा संपन्न : विकासाचा वसा घेऊन शाश्वत प्रगतीचा संकल्प.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : गावाचा विकास हीच खरी सेवा या ध्यासाने काम करणाऱ्या आदर्श स्मार्ट ग्राम कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या नेतृत्वाखाली गावातील ६८ नागरिकांनी महाराष्ट्र राज्यातील विविध आदर्श स्मार्ट ग्रामपंचायतींचा अभ्यास दौरा केला. या दौऱ्याचा उद्देश शाश्वत विकासाचे आदर्श मॉडेल जाणून घेऊन कळमना ग्रामविकासासाठी नवीन दिशा मिळवणे हा होता.
कळमना हे स्वच्छ, सुंदर, पर्यावरणपूरक आणि उपक्रमशील असे आदर्श स्मार्ट गाव म्हणून ओळखले जाते. सरपंच नंदकिशोर वाढई यांनी अल्पावधीत गावात अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवून गावाचे रूपांतर आदर्श स्मार्ट ग्रामात केले आहे. त्यांच्या या कार्यात पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्त समिती, गुरुदेव सेवा मंडळ, बचत गटांच्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामस्थ युवक यांनी उल्लेखनीय सहकार्य केले.
या दौऱ्यात लातूर जिल्ह्यातील सिकंदरपूर, सातारा जिल्ह्यातील निढळ व मान्याचीवाडी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पातोदा, तसेच अमरावती जिल्ह्यातील मधापुरी व मोझरी या आदर्श स्मार्ट ग्रामपंचायतींना भेट देऊन त्यांच्या विकास पद्धतींचा अभ्यास करण्यात आला. या भेटीदरम्यान शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या दौऱ्याविषयी माहिती देताना सरपंच नंदकिशोर वाढई यांनी सांगितले की, २०२१ मध्ये सरपंच झाल्यापासून माझा एकमेव ध्यास म्हणजे गावाचा सर्वांगीण विकास. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे आज कळमना हे गाव आदर्श स्मार्ट ग्राम म्हणून उभे आहे. या अभ्यास दौऱ्यातून आम्ही विकासाचा वसा घेतला असून, गावात शाश्वत विकासासाठी ठोस पावले उचलली जातील.
यावेळी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तंटामुक्त समिती अध्यक्ष निलेश वाढई, गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष महादेव ताजने, ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे, सुनिता उमाटे, तसेच महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक आणि युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.