निळा झेंडा दिसताच दलित महिलेला एका मोठ्या हॉटेल मधील खोली नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना.
📍वंचित आघाडीच्या महिला प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत हा प्रकार घडला ; हॉटेलच्या व्यवस्थापक विरोधात ॲक्ट्रॉसिटी कायदान्वये गुन्हा दाखल.
एस.के.24 तास
अकोला : दलित असल्याने महिलेला एका मोठ्या हॉटेलमधील खोली नाकारण्यात आल्याची धक्कादायक घटना अकोल्यात घडली आहे.वंचित आघाडीच्या महिला प्रदेश पदाधिकाऱ्यांसोबत हा प्रकार घडला.या प्रकरणी त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी हॉटेलच्या व्यवस्थापक विरोधात ॲक्ट्रॉसिटी कायदान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली.
अकोला शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिनाची मोठी परंपरा आहे,जी दरवर्षी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आयोजित केली जाते.ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात होणाऱ्या या सोहळ्यात भव्य मिरवणूक,जाहीर सभा आणि हजारो लोकांचा प्रचंड उत्साह असतो.हा सोहळा भारतीय बौद्ध महासभाद्वारे आयोजित केला जातो.गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा अखंडपणे सुरू असून त्यात सातत्याने हजारो लोकांची गर्दी असते.
नागपूर येथील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर अनुयायांना अकोल्यातील महोत्सवाचे वेध लागतात.विविध ठिकाण वरून अनुयायी मोठ्या संख्येने येथे दाखल होतात.या सोहळ्यात भव्य मिरवणूक,विविध आकर्षक देखावे, लेझीम पथके आणि प्रचंड उत्साह दिसून येतो.
धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सवांतर्गत धम्म मेळाव्याच्या विशाल जाहीर सभेत ॲड.प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका मांडतात ? याकडे राजकीय व सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागून असते.या महोत्सवात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष स्नेहल अरुण सोहनी आपला भाऊ व इतर कार्यकर्त्यांसह अकोल्यात शुक्रवारी सकाळी दाखल झाल्या.
मुक्काम करण्यासाठी त्यांनी बसस्थानकाजवळील " हॉटेल रायझिंगस " गाठले.त्यांना दोन खोल्या हव्या होत्या. हॉटेल व्यवस्थापनाने त्यांना हॉटेलमधील खोल्या दाखवल्या. त्या पसंत पडल्याने त्यांनी खोलीची नोंदणी करण्याचे सांगितले.हॉटेल व्यवस्थापनाला स्नेहल सोहनी यांच्या सामानामध्ये निळ्या रंगाचा ध्वज आढळून आला.त्यानंतर हॉटेल व्यवस्थापनाने खोली देण्यास टाळाटाळ केली.
अगोदरच त्याची नोंदणी झाल्याचे कारण समोर केले. आपण दलित असल्याचे लक्षात आल्यावर हॉटेल व्यवस्थापनाने खोली देण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप करून अरुण सोहनी यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणात पोलिसांनी " हॉटेल रायझिंगसन " च्या व्यवस्थापकाविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलीस तपास करीत आहे.