गडचिरोली मध्ये GST च्या भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम शासनाच्या खात्यात न भरता तब्बल 71 लाख 9 हजार 401 रुपयांचा अपहार.
📍चार्टर्ड अकाउंटंट अविनाश भोयर यांना केली पोलिसांनी अटक.
एस.के.24 तास
गडचिरोली : जीएसटीच्या भरणा करण्यासाठी दिलेली रक्कम शासनाच्या खात्यात न भरता तब्बल 71 लाख 9 हजार 401 रुपयांचा अपहार केल्याच्या आरोपावरून गडचिरोलीतील एका चार्टर्ड अकाउंटंटला पोलिसांनी अटक केली आहे. ही धक्कादायक घटना सोमवार 7 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली.
अविनाश नरेंद्र भोयर वय,41 वर्ष रा.म्हाडा कॉलनी, कॅम्प एरिया,गडचिरोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.या प्रकरणी कन्नमवार वॉर्ड गडचिरोली येथील सुनील मुरलीधर बट्टूवार यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारी नुसार बट्टूवार यांच्या पत्नी वैशाली सुनील बट्टूवार यांच्या नावाने मे.बालाजी इनफा,गडचिरोली अशी फर्म असून ती एमएसईबीच्या ठेकेदार म्हणून काम करते.फर्मचा वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने जीएसटी तसेच इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्यासाठी त्यांनी सी.ए.अविनाश भोयर यांची नियुक्ती केली होती.
जीएसटी भरण्यासाठी वेळोवेळी बट्टूवार यांनी भोयर यांच्या विविध खात्यांवर तसेच फोन पे द्वारे व काही रक्कम रोख स्वरूपात दिली होती.भोयर यांनी ती रक्कम शासनाच्या जीएसटी खात्यात जमा न करता स्वतःकडेच ठेवली.त्यामुळे बट्टूवार यांच्या फर्मचा जीएसटी क्रमांक रद्द करण्याची कार्यवाही जीएसटी विभागाकडून सुरू झाली.
विचारणा केल्यावर भोयर यांनी रक्कम ऑनलाइन चालनद्वारे भरलेली आहे असा दावा केला. बट्टूवार यांनी जीएसटी कार्यालयात चौकशी केली असता 22 जानेवारी 2018 ते 30 ऑगस्ट 2025 या कालावधीत कोणतीही जीएसटी रक्कम भरलेली नाही हे उघड झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली.
गडचिरोली पोलिसांनी तपासाअंती सी.ए.अविनाश भोयर यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये 71 लाख 9 हजार 401 रुपयांच्या अपहाराचा गुन्हा दाखल करून अटक केली.पुढील तपास गडचिरोली पोलिसांकडून सुरू आहे.