स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून ७३० बॉक्स देशी दारूचा साठा एक चारचाकी वाहनासह एकूण ७३ लाख ४० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त.
📍एकाला अटक तीन आरोपी घटना स्थळावरून फरार.
एस.के.24 तास
अहेरी : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गडचिरोली पोलिसांनी आज, बुधवारी मोठी कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून ७३० बॉक्स देशी दारूचा साठा आणि दारू वाहतुकीसाठी वापरले जाणारे एक चारचाकी वाहन ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ७३ लाख ४० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.मद्दीगुडम येथे धाड, एकाला अटक केली.पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अहेरी पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा मद्दीगुडम येथे अवैध देशी दारूचा साठा असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने घटनास्थळी धाड टाकली.
धाडीदरम्यान, अवैध दारू विक्रीसाठी घेऊन जाण्याच्या तयारीत असलेले देशी दारूने भरलेले एक महिंद्रा स्कॉर्पिओ (क्र. एम एच ३४ सीडी ८४१०) वाहन आढळले.पोलिसांनी तात्काळ मिथुन विश्वास मडावी वय, ३५ वर्ष रा.आलापल्ली ता.अहेरी या आरोपीस वाहनासह ताब्यात घेतले.
पोलिसांची चाहूल लागताच इतर तीन आरोपी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.७३ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी ७३० नग देशी दारूचे बॉक्स (किंमत अंदाजे ₹ ५८,४०,०००/-) आणि ₹ १५,००,०००/- किंमतीचे महिंद्रा स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ₹ ७३ लाख ४० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन अहेरी येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या विविध कलमांखाली मिथुन विश्वास मडावी आणि इतर तीन फरार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आरोपी मिथुन मडावी यास अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे, तर फरार आरोपींचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास अहेरी पोलीस स्टेशनचे सपोनि.देवेंद्र पटले करीत आहेत.
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अरुण फेगडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.